डाव्यांची सत्ता संपुष्टात
लॅटिन अमेरिकेतील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अर्जेटिना देशात अध्यक्षा क्रिस्टिना क्रिचनर यांना मतदारांनी पायउतार केले असून बाजारपेठवादी मॉरिसिओ मॅक्री यांना सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. बारा वर्षांची क्रिचनर यांची सत्ता अखेर संपुष्टात आली.
काल झालेल्या निवडणुकीत मॉरिसिओ मॅक्री यांनी विजय मिळवला असून त्यांनी गेली अनेक वर्षे आर्थिक अस्थिरतेत अडकलेल्या या देशाला त्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे. मॉरिशियो मॅक्री यांना उद्योग व परदेशी गुंतवणूक क्षेत्राचा पाठिंबा होता. १९९० नंतर मॅक्री हे अर्जेटिनातील सर्वात उदार आर्थिक विचार असलेले नेते आहेत. हा ऐतिहासिक दिवस आहे, बदलाचे पर्व सुरू झाले आहे असे मॅक्री यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डॅनियल सिओली यांच्या पराभवानंतर समर्थकांशी बोलताना सांगितले. आता सूडाच्या कारवाया करण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मॅक्री व सिओली यांनी १२ वर्षांत प्रथमच कडवी झुंज दिली. बारा वर्षांची डाव्यांची सत्ता संपुष्टात आली असून मॅक्री यांनी परदेश व्यापार व डॉलर र्निबध हटवण्याचे आश्वासन दिले आहे. अर्जेटिनात शून्य दारिद्य््रा, अमली पदार्थ तस्करीचा पराभव व लोकशाहीचे मजबुतीकरण ही आव्हाने आहेत. मॅक्री यांना ५१.८ टक्के तर सिओली यांना ४८.२ टक्के मते मिळाली, एकूण ९५ टक्के मतदान झाले. मॅक्री हे ब्रिटन व अमेरिकेशी संबंध सुधारणार आहेत. फॉकलंड बेटांवरून मावळत्या अध्यक्ष क्रिचनर यांची ब्रिटनशी खडाजंगी झाली होती.