बोको हराम या कट्टर इस्लामी संघटनेच्या अतिरेक्यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर नायजेरियातील एका शाळेच्या वसतीगृहातील शंभरहून अधिक मुलींचे अपहरण केले. मात्र अनेक मुली उघडय़ा लॉरीतून उडय़ा टाकून जंगलात पसार झाल्याने नेमक्या किती मुली अतिरेक्यांच्या तावडीत आहेत आणि किती बेपत्ता आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या शोधासाठी बोर्नो प्रांतात सुरक्षा दले शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.या वसतीगृहात घुसताना अतिरेक्यांनी एका सैनिकाला आणि एका पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले होते.दहशतवाद्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बोर्नो राज्यातील सर्व शाळा गेल्या तीन आठवडय़ांपासून बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात बोको हरामने दीड हजार नागरिकांची हत्या केली असून त्यात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुलींचे मात्र अपहरण केले जाते आणि त्यांना गुलाम म्हणून वागविले जाते.