दोन मिनिटांत तयार होऊन भूक शमवण्याचा दावा करणाऱ्या मॅगीवरील बंदीचे मळभ अधिकच दाट होऊ लागले आहेत. आरोग्याला घातक असलेल्या मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे यांचा अतिप्रमाणात वापर केल्याच्या आरोपावरून मॅगी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिल्लीत मॅगीवर १५ दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. तर बिग बाजारच्या देशभरातील मॉल्समधूनही मॅगीला तूर्तास हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र, गोवा व केरळातील नमुने निर्दोष आढळल्याने मॅगीउत्पादक नेस्ले कंपनीला काहीसा दिलासा मिळाला आहे.
उत्तर प्रदेश अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत मॅगीच्या मसाल्यात मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसे यांचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळले होते. या पाश्र्वभूमीवर उत्तर प्रदेशात बहुतेक शहरांतून मॅगीची दोन लाख पाकिटे कंपनीला परत मागवावी लागली होती. त्यानंतर मॅगीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचा सपाटाच देशभरातील राज्यांनी लावला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, गोवा, दिल्ली, मेघालय व महाराष्ट्र या राज्यांत मॅगीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात महाराष्ट्र व गोव्याने मॅगीला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले आहे. तर दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने १५ दिवसांसाठी मॅगीवर बंदी जाहीर केली आहे. या दरम्यान मॅगीची सर्व पाकिटे दिल्लीतील दुकाने व मॉल्समधून परत मागवण्यात येणार आहेत.
दरम्यान, मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन यांच्याविरोधात बिहारमध्ये प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. परंतु  या संदर्भात आपल्याला नोटीस अद्याप प्राप्त झाली नसल्याचे बच्चन यांनी स्पष्ट केले. तसेच दोन वर्षांपूर्वीच आपण मॅगीची जाहिरात करणे बंद केल्याचेही त्यांनी सांगितले. माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्याविरोधातही प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.

केंद्राकडून दखल
मॅगी प्रकरणाची दखल घेत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत ग्राहक तक्रार निवारण आयोगाला लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गोव्यातील नमुने निर्दोष
मॅगीच्या नमुन्यांची गोव्यात तपासणी करण्यात आली असता त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसे यांचे अतिप्रमाण आढळले नसल्याचे गोव्याच्या अन्न व औषध उपसंचालक ज्योती सरदेसाई यांनी सांगितले. केरळमधील नमुनेही निर्दोष आढळल्याचे समजते.

लष्करातही बंदी
लष्कराने देशभरातील एक हजार कँटिन्समधून मॅगीची पाकिटे तातडीने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करातील जवानांकडून मोठय़ा प्रमाणात मॅगीचे सेवन होत असते. या पाश्र्वभूमीवर लष्करात मॅगीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या मॅगीच्या नमुन्यांत मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसे आढळलेले नाही. मात्र, असे असले तरी अन्न व औषध प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे.
– गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठामंत्री (महाराष्ट्र)