दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी मानवी ढालीचा वापर करणाऱ्या मेजर लितुल गोगोई यांच्या लष्कराकडून करण्यात आलेल्या सन्मानामुळे भारतीय जवानांचे मनोधैर्य उंचावेल, असे मत देशातील सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. काश्मिरात सध्या छुप्या युद्धाच्या नावाखाली लष्कराला एका गलिच्छ अशा युद्धाला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारच्या युद्धाचा सामना करण्यासाठी लष्कराला अभिनव मार्गाचा अवलंब करावा लागतो, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी रविवारी एका मुलाखतीदरम्यान मेजर लितुल गोगोई यांचे समर्थन केले होते. लष्करप्रमुखांचे हे शब्द भारतीय जवानांना प्रेरणा देतील.काश्मीरमधील सध्याची परिस्थिती खूपच अवघड आहे. अशावेळी लष्कराच्या हाती मोजकेच पर्याय उरतात. मात्र, मेजर गोगोई यांनीही चौकटीबाहेर जाऊन उपाय शोधला. सुदैवाने त्यांची ही युक्ती सफल ठरली. त्यानंतर लष्करप्रमुखांनी मेजर गोगोई यांच्या निर्णयाला दर्शविलेल्या पाठिंब्यामुळे भारतीय सैन्याचे मनोबल वाढेल आणि त्यांना प्रेरणाही मिळेल, असे निवृत्त मेजर जनरल पी.के. सेहगल यांनी म्हटले.

जीपसमोर बांधायला जनावर होतो का?; ‘त्या’ काश्मिरी तरुणाचा संतप्त सवाल

निवृत्त विंग कमांडर प्रफुल्ल बक्षी यांनीदेखील गोगोई यांचे कौतुक करताना असामान्य परिस्थितीसाठी असामान्य उपाय शोधावा लागतो, असे म्हटले. मेजर गोगोई यांनी त्यांचे हे काम उत्तमपणे केले. त्यानंतर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही योग्य तो संदेश दिला. दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याने मेजर गोगोईंप्रमाणे विचार केला नसता. त्यांनी एकही गोळी न झाडता सगळ्यांना सहीसलामत बाहेर काढले. त्यांचा आणखी मोठा सन्मान व्हायला पाहिजे होता, असे बक्षी यांनी म्हटले.

तरुणाला जीपला बांधणाऱ्या मेजरचा लष्कराकडून प्रमाणपत्र देऊन सन्मान

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत लष्करप्रमुख रावत यांनी काश्मिरातील सद्यस्थितीतबाबत परखड भाष्य केले होते. ते म्हणाले, ‘काश्मीर खोऱ्यात सध्या प्रचंड प्रमाणात हिंसक कारवाया होत आहेत. जमाव आमच्यावर दगडफेक करतो. वस्तुत या लोकांनी आमच्यावर दगडफेक करण्याऐवजी शस्त्रे चालवली तर मला जास्त आनंद होईल. कारण त्यामुळे आम्हाला जे करायचे आहे, ते करता येईल. खोऱ्यातील जनता आमच्या जवानांवर दगडफेक करते, पेट्रोबॉम्बचा वर्षांव करते. अशावेळी माझ्या जवानांनी काय करू, असे विचारले तर मी त्यांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही. तुमच्यासाठी शवपेटय़ा तयार करून ठेवल्या आहेत, त्यात तुमचे मृतदेह फुलांनी सजवून तुमच्या मूळ गावी पाठवेन, असे मी त्यांना सांगू का? लष्करप्रमुख म्हणून मला माझ्या माणसांचे मनोबल उंचवण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे भागच आहे.’ घुसखोरी व सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया थांबवल्या गेल्याच हव्यात. सुटीवर असलेला तरुण लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फय्याज दहशतवाद्यांकडून मारला जातो, तेव्हा लोक आवाज का उठवत नाहीत असा सवालही लष्करप्रमुखांनी केला. काश्मीरसंदर्भातील राजकीय तोडग्याबाबत विचारले असता, ‘हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. अशा उपाययोजना यापूर्वीही झाल्या. परंतु त्याची परिणती कारगिलच्या युद्धात झाली’, असे रावत म्हणाले. पाकिस्तानशी मर्यादित युद्ध अपेक्षित नसल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.