Army Chief Upendra Dwivedi Speech: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतेच मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी रेवा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना उपेंद्र द्विवेदी यांनी भविष्यातील धोक्यांच्या अनिश्चिततेबद्दल भाष्य केले. यासह त्यांनी ऑपरेशन सिंदूर, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह विविध मुद्द्यांवरही टिप्पणी केली.

“तुम्हाला आणि मला भविष्यात काय होणार आहे याबद्दल पूर्णपणे काहीच कल्पना नाही. ट्रम्प आज काय करत आहेत? मला वाटते ट्रम्प यांना स्वतःलाच माहित नाही की ते उद्या काय करतील”. असे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे.

“आव्हाने इतक्या वेगाने येत आहेत की जेव्हा तुम्ही जुने आव्हान समजून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा नवीन आव्हान समोर आलेले असते आणि याच प्रकारची आव्हाने आपल्या लष्करासमोर येत असतात. मग ते सीमेवरील असो, दहशतवाद असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा सायबर युद्ध असो. आता नव्याने समोर येत असलेल्या आव्हानांमध्ये अंतराळ, उपग्रह, रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि माहिती युद्ध यांचा समावेश आहे”, असेही ते पुढे म्हणाले.

माहिती युद्धाबाबत बोलताना ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान कराचीवर हल्ला झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आम्हालाही अशा बातम्या ऐकायला मिळाल्या आणि त्या कुठून आल्या आणि त्या कोणी सुरू केल्या याचा विचार करायला लागला. गोष्टी इतक्या वेगवान आणि गोंधळात टाकणाऱ्या असू शकतात.”

ऑपरेशन सिंदूरमधून शिकायला मिळालेल्या गोष्टींबद्दल बोलताना लष्करप्रमुख म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे केवळ शत्रूला पराभूत करण्यासाठी नव्हते तर ते सार्वभौमत्व, अखंडता आणि शांतता प्रस्थापित करण्याबद्दल देखील होते. पंतप्रधानांनी मला सांगितले की ऑपरेशनचे नाव ‘सिंदूर’ असेल. पंतप्रधानांनी स्वतः ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडले आणि त्याचा सर्वात मोठा फायदा काय होता? तर संपूर्ण देश ‘सिंदूर’ या नावामुळे एकत्र आला.”

लष्करप्रमुखांनी पुढे सांगितले की, “युद्धात नेहमीच जोखीम असते. जेव्हा तुम्ही हल्ला करता किंवा शत्रू तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा तुम्हाला माहित नसते की पुढे काय होईल. युद्धात नेहमीच अनिश्चितता असते. तुम्हाला माहित नसते की तुम्ही किती सैनिक गमावाल, तुम्हाला कोणती कारवाई करावी लागेल किंवा याचा किती नागरिकांना फटका बसेल. या जोखम असूनही, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आम्ही निर्णय घेतला की आमच्यासाठी धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्थानावर किंवा संघटनेवर थेट हल्ला केला जाईल.”