केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८५ व्या बटालियनच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीफचे पाच जवान शहीद झाले असून अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिकारात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. आणखी एक दहशतवादी मारला गेल्याचे वृत्त असून त्याला अद्याप दुजोरा मिळू शकला नाही. हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली असल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

लेथपोरा येथील तळावर सीआरपीएफच्या १८५ व्या बटालियनचे तसेच जिल्हा पोलिसांचेही मुख्य केंद्र आहे. राज्यात नव्याने दाखल होणाऱ्या निमलष्करी दलांच्या जवानांना तेथे दहशतवादविरोधी प्रशिक्षण दिले जाते. छावणीच्या मुख्य इमारतीत तीन ब्लॉक असून ब्लॉक क्रमांक १ हा कुटुंबीयांसाठी आहे, तर ब्लॉक तीन मध्ये रुग्णालय आहे. दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी हातबाम्ब फेकले आणि गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर दिले. त्यात एक जवान जागीच शहीद झाला तर अन्य चार जखमी जवानांना रुग्णालयात उपचारांदरम्यान वीरमरण आले.चकमकीत अन्य दोन जवान जखमी  झाले आहेत.

हल्ल्याबाबत पूर्वसूचना ..

  • राज्यात सुरक्षा दलांवर अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो याची सूचना गुप्तचरांकडून गेल्या दोन-तीन दिवसांपासून मिळाली होती.
  • कदाचित दहशतवाद्यांना यापूर्वी तशी संधी मिळाली नसावी म्हणून त्यांनी आज हल्ला केला आहे, असे राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वेद यांनी सांगितले. इतरही छावण्यांवर असे हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काँग्रेसची टीका

पुलवामा येथील हल्ला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुषमा देव यांनी केली आहे. पाकिस्तानने चालवलेल्या दहशतवादाला भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून त्यात पाकिस्तान आता पराभूत होऊ लागले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army jawan killed in ceasefire violation
First published on: 01-01-2018 at 02:16 IST