पीटीआय, नवी दिल्ली

श्रीनगरहून दिल्लीला निघालेल्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने विमानतळावर ‘स्पाइसजेट’च्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार कंपनीने केली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीने रविवारी ही माहिती दिली. ही घटना २६ जुलै रोजी घडली.

कंपनीने या अधिकाऱ्याचे नाव ‘नो फ्लाय’च्या यादीत टाकण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. विमानातून अतिरिक्त सामान नेण्यासाठी शुल्क मागितल्यावरून ही मारहाण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचे मणक्याचे हाड मोडले आहे. तसेच, अन्य एका कर्मचाऱ्याच्या जबड्यालाही दुखापती झाल्या आहेत. मारहाणीत एक कर्मचारी बेशुद्ध पडल्यानंतरही त्याला अधिकाऱ्याने मारणे सुरू ठेवल्याचे कंपनीने सांगितले आहे. ‘स्पाइसजेट’ने नागरी उड्डाण मंत्रालयाला या संदर्भात पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.