Jyoti Malhotra Instagram Account Suspend : हरियाणातील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास १ लाख ३३ हजार फॉलोअर्स होते. पाकिस्तानसाठी तिने हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप असल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचं तिचं युट्यूब चॅनेल आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी ती पाकिस्तानला गेली होती. तिची ही ट्रीप स्पॉन्सर्ड करण्यात आली होती, असंही पोलिसांना चौकशीतून समजलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान ज्योती पाकिस्तानच्या संपर्कात होती. परंतु,भारतीय संरक्षणासंबंधातील कोणतीही गुप्तचर माहिती तिच्याकडे नव्हती. पाकिस्तानी एजंटने पाकिस्तानचं चित्र सकारात्मक बनवण्यासाठी तिचा वापर केला होता.

काय आहे ज्योती मल्होत्रा प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी मूळची हरियाणाच्या हिसारची असणारी ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली. भारताबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ज्योतीवर असून तिची कसून चौकशी केली जात आहे. ज्योती याआधी पाकिस्तानलादेखील जाऊन आली असून भारतातील पाकिस्तानी दूतावासातही तिचा चांगला संपर्क असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्योतीनंच गेल्या वर्षी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाकडून इफ्तार पार्टीचं विशेष आमंत्रण आल्याचं आपल्याच व्हिडीओमध्ये नमूद केलं होतं.

ज्योती मल्होत्रानं या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दूतावासातील तत्कालीन अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश यानं आपल्याला या पार्टीसाठी विशेष आमंत्रित केल्याचंही म्हटलं आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये दानिशच ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील उच्चपदस्थांशी ओळख करून देत असल्याचंही दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दानिशची हकालपट्टी

दरम्यान, अवघ्या आठवड्याभरापू्र्वीच भारत सरकारने दानिशची हेरगिरीच्या आरोपावरून भारतातून हकालपट्टी केली होती. दानिश व ज्योती एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते, अशी माहितीही प्राथमिक तपासातून समोर येत आहे.