ईव्हीएममध्ये घोटाळा करता येतो असे सांगताना आपण आयआयआटीमध्ये शिकलो आहोत, ईव्हीएममध्ये घोळ करण्याचे १० मार्ग मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. अरविंद केजरीवाल यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टीवर चर्चा केली. पंजाब निवडणूक हरल्यानंतर आपण ईव्हीएममध्ये घोळ असल्यामुळे हरलो असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांच्या म्हणण्याचा विरोध केला होता.

तुमच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करा आमच्यावर खापर फोडू नका असे केजरीवालांना आयोगाने खडसावले होते. केजरीवाल तसेच इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केल्यानंतर निवडणूक आयोगाने आपले म्हणणे सिद्ध करून दाखवा असे आव्हान दिले आहे. मे महिन्यामध्ये ही चाचणी होणार असून ईव्हीएममध्ये घोळ करुन दाकला असे आव्हान आयोगाने सर्वांना दिले आहे. दिल्लीतील राजौरी गार्डन येथे झालेल्या पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली.

हा पराभव म्हणजे आगामी काळात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकांची झलक नसल्याचे त्यांनी सांगितले. राजौरी गार्डन मतदार संघाचे आमदार जर्नेल सिंग हे पंजाबमध्ये निवडणूक लढवण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी प्रकाश सिंग बादल यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि तेथे ते पडले. त्यांना पंजाबमध्ये पाठवल्याचा रोष होता. त्यामुळे आपने ही पोटनिवडणूक हरली असे केजरीवाल म्हणाले.  आप सत्तेमध्ये आल्यापासून अनेक कामे झाली आहेत असे ते म्हणाले. पाणी आणि वीजेचा प्रश्न आमच्या काळात सुटल्याचे ते म्हणाले.

केजरीवाल सरकारने जाहिरातींवर प्रचंड प्रमाणात खर्च केला आहे. आपकडून हा खर्च वसूल करण्यात यावा असे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी म्हटले. याबाबतही त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही केवळ जनहितार्थ जाहिरातींनाच प्रसिद्धी दिल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेमध्ये आलेल्या कामांच्या जोरावरच आगामी महापालिका निवडणूक जिंकू असे केजरीवाल यांनी म्हटले. या निवडणूक प्रचारावेळी आमचा भर कुणावर टीका करण्यावर नसेल तर पूर्ण झालेल्या कामांच्या प्रसिद्धिवर असेल असे त्यांनी स्पष्ट केले.