मला मारण्याने देशाचे प्रश्न सुटणार असतील, तर सांगेल तिथे येऊन हवा तितका मार खाण्यास मी तयार आहे. मात्र, मला माहिती आहे की मला मारून देशाचे प्रश्न सुटणार नाही, असे स्वगत मांडत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्यावर हल्ला करणाऱयांना माफ केल्याचे स्पष्ट केले.
केजरीवाल यांच्यावर मंगळवारी दुपारी दिल्लीमध्ये एका रिक्षाचालकाने हल्ला केला. आपच्या उमेदवार राखी बिडला यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रॅलीमध्ये केजरीवाल सहभागी झाले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने सुरुवातीला त्यांच्या गळ्यात हार घातला आणि नंतर जोरदार त्यांच्या श्रीमुखात भडकावली. या हल्ल्यानंतर केजरीवाल आपल्या समर्थकांसह काहीवेळ महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन बसले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे माझ्यावर हल्ला होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, माझ्यावर गुजरातमध्येही हल्ला झाला, तिथे कुठे आपचे सरकार आहे. माझ्यावर हरियाणातील भिवानीमध्येही हल्ला झाला, तिथे कुठे आमचे सरकार आहे. त्यामुळे माझ्यावर हल्ला करणाऱयांचा म्होरक्या कोण आहे, हे शोधून काढले पाहिजे. तो एकच आहे की वेगवेगळे आहेत, हे सुद्धा पोलीसांनी शोधले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, माझ्यावर हल्ला झाल्यानंतरही आपच्या कार्यकर्त्यांनी समोरच्या व्यक्तीवर अजिबात प्रतिहल्ला करू नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
रिक्षाचालकाने केजरीवालांच्या श्रीमुखात भडकावली!
आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. केजरीवाल यांना अवघ्या चारच दिवसांपूर्वी ठोसा मारण्यात आला होता. त्यानंतर, वायव्य दिल्ली येथील सुलतानपूर परिसरात एका रोड शो दरम्यान त्यांच्या श्रीमुखात भडकावली गेली. केजरीवाल यांनी या घटनेस भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.‘रोड शो’दरम्यान केजरीवाल आप समर्थकांशी हस्तांदोलन करीत होते. याच दरम्यान एक इसम त्यांच्याजवळ आला आणि त्याने केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली. या इसमाने डोक्यावर ‘आप’ची टोपी घातली होती आणि तो रिक्षाचालक होता. त्याने हल्ला करताच जवळ असलेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडले. पोलिसांनी अखेर त्या इसमास अटक केली.

हल्ल्यांचे सत्र सुरूच
शुक्रवारी दक्षिण दिल्लीतील दक्षिणपुरी परिसरात एका १९ वर्षीय युवकाने केजरीवाल यांना ठोसा लगावला होता. २८ मार्च रोजी हरयाणा येथील प्रचार रॅलीदरम्यान अण्णा हजारे समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाने केजरीवाल यांना लक्ष्य केले होते, तर मागील आठवडय़ात केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वाराणसी येथे शाई फेकली होती.