Arvind Kejriwal Rajya Sabha: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे अरोरा यांच्याजागी आता अरविंद केजरीवाल हे राज्यसभेत जाऊ शकतात, अशी अटकल बांधली जात आहे. दिल्ली विधानसभेत पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवालांकडे कोणतेही महत्त्वाचे पद नाही. दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही आतिशी सिंह यांना देण्यात आले. त्यानंतर ते पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याची आवई उठली होती. मात्र आता संजीव अरोरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यामुळे राज्यसभेत जाणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. यावर आम आदमी पक्षानेही प्रतिक्रिया दिली आहे.

संजीव अरोरा लुधियाना येथील उद्योगपती असून २०२२ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. आम आदमी पक्षाचे लुधियाना येथील आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचे मागच्या महिन्यात निधन झाले, त्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. याठिकाणी संजीव अरोरा यांना तिकीट देण्यात आले आहे. पोटनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार?

भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही संजीव अरोरा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अरविंद केजरीवाल यांना पंजाबमधून राज्यसभेवर जाता यावे, यासाठी संजीव अरोरा यांना बाजूला केले जात आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच केजरीवाल यांच्या जागी पंजाबमधीलच एखादा उमेदवार राज्यसभेवर गेलेला चालणार नाही का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही संजय अरोरा यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेरगील यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, केजरीवाल यांना राज्यसभेत का जायचे आहे? केजरीवाल यांना दिल्लीत सरकारी निवासस्थान हवे आहे का? निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना पदावरून दूर राहता येत नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आप’ने काय म्हटले?

अरविंद केजरीवाल यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेवर बोलताना आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका कक्कर म्हणाल्या की, संजीव अरोरा लुधियानामध्ये सक्रिय आहेत. यासाठी ते तिथून निवडणूक लढवू इच्छितात. माध्यमांचे सूत्र आधी केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवत होते, आता त्यांना राज्यसभा देत आहेत. पण त्यांनी आधी खातरजमा केली पाहीजे.