Ashoka University Professor Arrested Case : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर ७ मे रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि सुरक्षा दलाच्यावतीने पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली होती.
पण त्या पत्रकार परिषदेसंदर्भात हरियाणाच्या अशोका विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अली खान महमुदाबाद यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात हरियाणा पोलिसांनी आज त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात महिला आयोगाने देखील अली खान महमुदाबाद यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
दरम्यान, अली खान महमुदाबाद यांना अटक करण्यात आल्यानंतर आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता अशोका विद्यापीठाच्या फॅकल्टी असोसिएशनने प्रतिक्रिया देत त्यांचा बचाव केला आहे. एका निवेदनात प्राध्यापक संघटनेने प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या अटकेचा निषेध केला असून त्यांच्यावरील आरोप निराधार आणि असमर्थनीय असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
निवेदनात काय म्हटलं?
“प्राध्यापक महमूदाबाद यांना ज्या छळाचा सामना करावा लागला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना नवी दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक केल्यानंतर त्यांना सोनीपत येथे नेण्यात आलं. त्यांना आवश्यक ती औषधे देखील दिली गेली नाहीत. त्यांच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती न देता तासन्तास फिरवण्यात आलं”, असं निवेदनात म्हटलं आहे.
प्राध्यापक संघटनेने त्यांच्या सहकाऱ्याला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच प्राध्यापक महमूदाबाद हे विविध साहित्यिक आणि भाषिक परंपरांमध्ये पारंगत आहेत. दक्षिण आशिया आणि त्यापलीकडे इतिहास आणि राज्यशास्त्राचे एक तज्ञ आणि अभ्यासक आहेत. त्यांच्या सर्व लेखनात शैक्षणिक आणि व्यापक सार्वजनिक मंचांवर त्यांनी न्याय, बहुलवाद आणि एकता यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहेत. ते नेहमीच संवैधानिक मूल्ये आणि नैतिकतेचा आदर करतात. तसेच आम्ही प्राध्यापक महमूदाबाद यांची तात्काळ सुटका करण्याची आणि त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याची मागणी करत आहोत, असं निवेदनात म्हटलं आहे.