Ashoka University Professor Arrested Case : पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचं सांगितलं जातं. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर ७ मे रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि सुरक्षा दलाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली होती.
पण या पत्रकार परिषदेवरून हरियाणाच्या अशोका विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक तथा राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अली खान महमुदाबाद यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलं होतं. त्यानंतर आता प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हरियाणा पोलिसांनी प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या सात दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. मात्र, सोनीपत न्यायालयाने अली खान महमूदाबाद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्राध्यापक अली खान महमुदाबाद यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात हरियाणामधील भाजपा युवा मोर्चाच्या एका नेत्याने तक्रार केली होती. तसेच हरियाणा राज्य महिला आयोगानेही त्यांना नोटीस बजावली होती. या संदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबतची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, प्राध्यापक अली खान महमुदाबाद यांनी ऑपरेशन सिंदूरबाबतच्या पोस्ट करत मीडिया ब्रीफिंगला ढोंगीपणा म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्या वक्तव्यांचा गैरसमज करण्यात आल्याचं म्हणत आरोप फेटाळले होते.