अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अशरफ घनी आता अमेरिकेत जाऊ शकतात.  अशा परिस्थितीत अशरफ घनी सध्या ओमानमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशरफ घनी वगळता अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहिब हेही ओमानमध्ये आहेत. त्यांच्या दोन्ही विमानांना रविवारी ताजिकिस्तानमध्ये उतरण्याची परवानगी मिळू शकली नाही, म्हणून त्यांनी ओमानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आता अशरफ घनी येथून अमेरिकेत जाऊ शकतात.

२० वर्षांच्या लढाईनंतर अखेर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेले आहेत. अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे.

काबूल उद्ध्वस्त झाला असता

“जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असतो तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता ते अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवतील,” असे घनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashraf ghani in oman after tajikistan denied landing srk
First published on: 16-08-2021 at 14:54 IST