Gyanvapi Mosque Survery : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून ज्ञानवापी मशिद संकुलात सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाचा आजचा चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीकडून सहकार्य मिळत असून आजही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा हिंदू पक्षकारांचे एक वकील सुधीर त्रिपाठी यांनी व्यक्त केली आहे. ते एएनआय या वृत्तंसस्थेशी बोलत होते.
ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने शुक्रवार, २१ जुलै रोजी दिले होते. ग्राउंड पेनिट्रेशन रडार पद्धतीद्वारे सर्वेक्षण, आवश्यकता भासल्यास उत्खनन करून हिंदू मंदिराच्या जागेवर मशीद उभारली आहे का, याची तपासणी करण्यासाठी संबंधित बांधकामांचे कालमापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाने यासंदर्भातील अहवाल भारतीय पुरातत्त्व खात्याला ४ ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुरातत्त्व विभागाच्या ३० सदस्यांच्या पथकाने २४ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास सर्वेक्षणाला सुरुवातही केली होती. परंतु, चार तासांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर काम थांबवण्यात आले.
हेही वाचा >> ज्ञानवापी सर्वेक्षणावर बहिष्काराचा मुस्लीम पक्षकारांचा इशारा; खोट्या बातम्या पसरविल्याचा आरोप
सर्वेक्षणावर तात्पुरती स्थगिती आणून २६ जुलैपर्यंत अलाहाबाद हायकोर्टाने आदेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले होते. त्यानुसार अलाहाबाद कोर्टाने सुनावणी घेऊन २७ जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता. याप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, हायकोर्टाने आता निकाल दिला असून वैज्ञानिक सर्वेक्षणाला परवानगी देण्यात आली आहे.
त्यानुसार, ४ ऑगस्टपासून पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले. काल (६ जुलै) रविवार असूनही सर्वेक्षण सुरू होते. सकाळी आठ वाजता हे सर्वेक्षण सुरू झाले. जेवणासाठी दुपारी दोन तास हे काम बंद थांबवण्यात आले होते. हिंदू पक्षकारांचे एक वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले, की रविवारी तिन्ही घुमटांखाली शास्त्रीय पद्धतीने चाचण्या करण्यात आल्या. तेथे छायाचित्रण, मानक चित्रण, मोजमापाचे काम केले गेले.
आजच्या सर्वेक्षणाबाबत काय म्हणाले वकील?
त्याचप्रमाणे, आज (७ ऑगस्ट) चौथ्या दिवशीही सर्वेक्षणाचे काम सुरू राहणार आहे. श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने आजच्या कामजाकाला थोडा उशीर होऊ शकतो, अशी माहिती संजय त्रिपाठी यांनी दिली. सर्वेक्षण चमूमध्ये ४० जण आहेत. ते जरा उशिरा येतील, पण आज सर्वेक्षण नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रविवारी सर्वेक्षण सुरू होण्याआधी सुधीर त्रिपाठी म्हणाले होते की, शनिवारी सर्वेक्षणासाठी ‘डिफरेन्शियल ग्लोबल पोझिशिनग सिस्टम्स’सह (डीजीपीएस) अनेक आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आला. आतापर्यंतच्या सर्वेक्षणावर हिंदू-मुस्लिम दोन्ही पक्षकार समाधानी आहेत.
ज्ञानवापी प्रकरण काय आहे?
ज्ञानवापी मशीद परिसरात पूजाअर्चा करू देण्याची विनंती वाराणीसीतील काही साधूंनी १९९१ मध्ये न्यायालयाकडे केली होती. हिंदू मंदिराचा काही भाग उद्ध्वस्त करून ही मशीद बांधण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. अलिकडे पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशीद संकुलात शृंगारगौरीसह अन्य देवतांच्या पूजनासाठी परवानगी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने या संकुलाच्या तळमजल्यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरणासाठी समिती नेमली. या सर्वेक्षणाला मशीद व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतला. तिथे सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला, तर तो वजुखान्याचा भाग असल्याचा मुस्लिम याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मात्र, ‘शिवलिंग’ परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करून कालमापन करण्याची आवश्यकता हिंदू याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली.