Asim Munir : ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला धमक्या देणाऱ्या पाकिस्तानच्या असीम मुनीर यांच्यावर अमेरिकेतूनच टीका होते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आपल्याला पाठिंबा आहे ही बाब त्यांनीच सांगितली होती. मात्र अनेक अधिकाऱ्यांना ही बाब रुचलेली नाही. पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने मुनीर म्हणजे गणवेशातला ओसामा बिन लादेन अशी बोचरी टीका केली आहे. पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी असीम मुनीर यांची तुलना दहशतवादी ओसामा बिन लादेनशी केली आहे. पाकिस्तानला कितीही सूट दिली तरी त्यांच्या विचारात बदल होणार नाही असं रुबिन यांनी म्हटलं आहे.
मायकल रुबिन यांचं मुलाखतीत वक्तव्य
मायकल रुबिन यांनी एका मुलाखतीत हे म्हटलं आहे की असीम मुनीर म्हणजे लष्करी गणवेशातला ओसामा बिन लादेन आहे. पाकिस्तान आता अणु बॉम्बच्या धमक्या जगाला देतो आहे. जगाला धमक्या दिल्या जात आहेत. एक अधिकृत देश म्हणून पाकिस्तानला कुठला नैतिक अधिकारच उरलेला नाही. आता अमेरिकेने आपलं धोरण ठरवलं पाहिजे असंही रुबिन यांनी म्हटलं आहे.
असीम मुनीर यांचं वक्तव्य काय होतं?
व्यापारी आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी टाम्पा येथे आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये असीम मुनीर उपस्थितांना म्हणाले की, “आपण एक अणुशक्ती-संपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटले की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू.” असं विधान असीम मुनीर यांनी केलं होतं.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यामध्ये पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तेव्हापासून पाकिस्तान घाबरला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही त्यांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर असीम मुनीरने भारताच्या विरोधात गरळ ओकली. आता असीम मुनीर यांना गणवेशातला लादेन असं म्हटलं आहे.