Asim Munir : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांची वादग्रस्तं विधानं काही थांबण्यास तयार नाहीत. अर्ध जग अणुबॉम्बने नष्ट करु या आशयाचं विधान त्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने तर असीम मुनील म्हणजे लष्करी गणवेशातला ओसामा बिन लादेन असंही विधान केलं. मात्र असीम मुनीर यांचं गरळ ओकणं थांबलेल नाही. आता मुनीर यांनी रिलायन्सच्या जामनगरच्या फॅक्टरीवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
काय म्हणाले असीम मुनीर?
अमेरिकेतील टाम्पा शहरात पाकिस्तानी वंशाच्या लोकांच्या साठी डिनरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी असीम मुनीर म्हणाले आता जर संघर्ष सुरु झाला तर भारताच्या पूर्व भागापासून सुरुवात करत आपण पश्चिमेच्या दिशेने जाऊ. मुकेश अंबानी यांची जामनगरमध्ये जी रिफायनरी आहे ती जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे. या रिफायनरीवर हल्ला करु. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तान हा न्यूक्लिअर शक्ती असलेला देश आहे. आपण अर्धे जग घेऊन तर बुडूच पण जर आम्हाला बुडवण्याचा प्रयत्न झाला तर पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरमधील रिफायनरीवर करण्यात येईल अशी धमकीच असीम मुनीर यांनी दिली. भारताला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी हा उपाय आमच्याकडे उपलब्ध आहे असंही मुनीर बरळले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
अर्धे जग घेऊन बुडू असंही म्हणाले असीम मुनीर
व्यापारी आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी टाम्पा येथे आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये असीम मुनीर उपस्थितांना म्हणाले की, “आपण एक अणुशक्ती-संपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटले की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू.” असं विधान असीम मुनीर यांनी केलं होतं.
पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्यांनी असीम मुनीर यांच्याविषयी काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला धमक्या देणाऱ्या पाकिस्तानच्या असीम मुनीर यांच्यावर अमेरिकेतूनच टीका होते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आपल्याला पाठिंबा आहे ही बाब त्यांनीच सांगितली होती. मात्र अनेक अधिकाऱ्यांना ही बाब रुचलेली नाही. पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने मुनीर म्हणजे गणवेशातला ओसामा बिन लादेन अशी बोचरी टीका केली आहे. पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी असीम मुनीर यांची तुलना दहशतवादी ओसामा बिन लादेनशी केली आहे. पाकिस्तानला कितीही सूट दिली तरी त्यांच्या विचारात बदल होणार नाही असं रुबिन यांनी म्हटलं आहे.