Asim Munir’s Constitutional Shield : मुंबई : पाकिस्तानात प्रस्तावित २७व्या घटनादुरुस्तीमुळे तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या दुरुस्तीविरोधात पाकिस्तानात अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख असिम मुनीर यांना या घटनादुरुस्तीने अमर्याद अधिकार बहाल केले. ते आजवरच्या पाकिस्तानी लष्करशहांपेक्षा अधिक शक्तिमान आणि धोकादायक ठरू शकतात. 
असिम मुनीर यांना काही महिन्यांपूर्वी फील्ड मार्शल हा हुद्दा बहाल करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान त्यांनी दाखवलेल्या कथित ‘मर्दुमकी’बद्दल हा सन्मान करण्यात आल्याचे पाकिस्तान सरकारने जाहीर केले.

विश्लेषकांच्या मते, त्या मोहिमेतील पाकिस्तानची लष्करी नामुष्की झाकण्यासाठी विजयाचा डिंडिम पिटण्यात आला आणि या विजयाचे ‘श्रेय’ म्हणून मुनीर यांना फील्ड मार्शलपदी बढती देण्यात आली. पाकिस्तानमध्ये सध्या शाहबाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाचे सरकार सत्तेत असून, या सरकारला बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) बाहेरून पाठिंबा दिला आहे. या दोन्ही पक्षांपेक्षा अधिक संख्याबळ असलेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे सदस्य विरोधी बाकांवर बसतात. तर पीटीआयचे प्रमुख इम्रान खान गेले अनेक महिने कैदेत आहेत. तरीदेखील पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीत १२ नोव्हेंबर रोजी २३४ विरुद्ध ४ मतांनी घटनादुरुस्तीस मंजुरी मिळाली. पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या लाचारीमुळे मुनीर यांच्या लष्करी यंत्रणेला अधिकाधिक मोकळे रान मिळत असून, पाकिस्तानातील लोकशाही दिवसेंदिवस गर्तेत जात असल्याचे तेथील विश्लेषकांचे आणि राजकीय विरोधकांचे मत आहे.   

Pakistan Constitutional Amendment : २७वी घटनादुरुस्ती

पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय प्रक्षोभाच्या मुळाशी आहे २७वी घटनादुरुस्ती. तेथील लष्कराचे अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, केंद्र आणि राज्ये यांच्यातील संपत्तीवाटप अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा यात समावेश आहे. मात्र लष्कराशी संबंधित बदलांची चर्चा सर्वाधिक आहे. पाकिस्तानच्या घटनेतील अनुच्छेद २४३मध्ये लष्कराच्या अधिकारकक्षांविषयी तरतुदी आहेत. याअंतर्गत लष्करावर पाकिस्तानच्या लोकनियुक्त सरकारचे नियंत्रण आणि अधिकार असतो. तर अध्यक्ष हे सैन्यदलांचे सर्वोच्च सेनापती असतात. मात्र घटनादुरुस्तीनंतर यात काही बदल होतील. त्यानुसार, सैन्यदल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस – सीडीएफ) हे नवे पद निर्माण करण्यात आले असून, त्यावर विद्यमान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची नियुक्ती केली जाईल. लष्कर, नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांचे संयुक्त सेनापती यापुढे पाकिस्तानचे लष्करप्रमुखच राहतील. फील्ड मार्शल या पदाला अशा प्रकारे घटनात्मकतेचे कवच प्रदान करण्याचा शरीफ सरकार आणि मुनीर यांचा प्रयत्न सध्या तरी यशस्वी ठरला. तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त समितीचे प्रमुख (सीजेसीएससी) जनरल शाहीर शमशाद मिर्झा आहेत. ते २७ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर हे पदच रद्द होईल. 

Pakistan Constitutional Amendment : अण्वस्त्रांचे ‘बटण’ मुनीर यांच्याकडे?

सैन्यदल प्रमुख या नात्याने मुनीर यांच्याकडे पाकिस्तानच्या अण्वस्त्र दलांचेही प्रमुखपद राहील. सध्या अण्वस्त्रांचे नियंत्रण पाकिस्तानच्या लोकनियुक्त सरकारकडे असते. सैन्यदल प्रमुखांची नियुक्ती तेथील अध्यक्षांमार्फत होईल. त्यांना पदच्युत करण्याचा अधिकार तेथील सरकारकडे नव्हे, तर पार्लमेंटकडे असेल. ही प्रक्रिया महाभियोगाप्रमाणेच चालवावी लागेल. मुनीर यांनी ऑपरेशन सिंदूरच्या काळात आणि नंतरही अण्वस्त्रांनी विध्वंस घडवून आणण्याची धमकी दिलेली आहे.  आता अण्वस्त्रांचे नियंत्रणही मुनीर यांच्याकडे आल्यामुळे भारताच्या दृष्टीने त्यांचे उपद्रवमूल्य वाढेल हे नक्की.    

Pakistan Constitutional Amendment : ‘जिहादी जनरल’

पाकिस्तानचे लष्करशहा (प्रथम लष्करप्रमुख आणि नंतर अध्यक्ष) झिया उल हक आणि असिम मुनीर यांच्या बाबतीत एक योगायोग घडून आला. झिया उल हक पाकिस्तानचे लष्करशहा असताना त्यांनी पाकिस्तानी लष्कराला जिहादी रूप देण्याचा प्रयत्न केला. भारताशी लष्करी स्पर्धेस त्यांनी धर्मयुद्धाची जोड दिली. विशेष म्हणजे त्यांच्याच काळात म्हणजे १९८६मध्ये असिम मुनीर पाकिस्तानी लष्करात दाखल झाले. त्यावेळच्या अनेक तरुण अधिकाऱ्यांप्रमाणे मुनीर यांच्यावरही इस्लामी वर्चस्ववादाचा प्रभाव होता. त्यांनी धार्मिक ग्रंथांचे वाचन केले होते. सौदी अरेबियात लष्करी प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मुनीर यांनी संपूर्ण कुराण तोंडपाठ म्हणून दाखवले होते. त्याबद्दल त्यांना हाफीझ-ए-कोरान हा किताबही देण्यात आला. त्यांच्या अनेक भाषणांमध्ये इस्लामचे दाखले, कुराणातील वचने यांचा समावेश असतो. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरलेला धर्माधिष्ठित द्विराष्ट्रवाद या सिद्धान्ताचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. पहलगाम हल्ल्यापूर्वीच्या वादग्रस्त भाषणातही त्यांनी तेथे उपस्थित अनिवासी परदेशस्थ पाकिस्तानींना उद्देशून सांगितले, की इस्लाममध्ये धर्माच्या आधारावर आजवर दोनच राष्ट्रांची निर्मिती झाली. त्यांतील एक म्हणजे रियासत-ए-तैय्यबा किंवा रियासत-ए-मदिना, ज्याची निर्मिती खुद्द प्रेषित मोहम्मद यांनी केली. दुसरे राष्ट्र अल्लाने १३०० वर्षांनंतर निर्माण केले, ते म्हणजेच तुमचा पाकिस्तान!

Pakistan Constitutional Amendment : झिया, मुशर्रफपेक्षाही मुनीर कडवे

पाकिस्तानचे लष्करशहा भारतासाठी कायम डोकेदुखी ठरत आले आहेत. याह्या खान, अयुब खान, टिक्का खान, झिया उल हक, परवेझ मुशर्रफ यांपैकी प्रत्येकाने भारतावर हल्ला करण्याचे किंवा कुरापती काढण्याचे धोरण राबवले. प्रत्येकाला भारताने धडा शिकवला. पण या शत्रुत्व पर्वामध्येही या लष्करशहांनी भारताशी चर्चा करणे थांबवले नव्हते. झिया आणि मुशर्रफ तर भारताचा पाहुणचारही उपभोगून गेले. असिम मुनीर हे या सर्वांच्या तुलनेत अधिक आतबट्ट्याचे आणि म्हणून अधिक धोकादायक ठरतात. त्यांनी कधीही भारतीय नेत्यांशी वा लष्कराशी चर्चा केलेली नाही. तसा प्रस्तावही कधी मांडलेला नाही. मुनीर यांच्या आधीचे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात अधिक व्यवहारवादी दृष्टिकोन अंगिकारला होता. युद्धांमुळे दक्षिण आशियाचे अतोनात आर्थिक नुकसान होते अशी भूमिका मांडली होती. मुनीर मात्र युद्धखोर आहेत. ‘भारतावर पूर्वेकडून (बांगलादेश सीमेवरून) हल्ला करून, पश्चिमेकडे (पाकिस्तान सीमेकडे) सरकत येऊ,’ अशी मल्लीनाथी त्यांनी केली होती.

 Pakistan Constitutional Amendment : फील्ड मार्शल… त्यांचे नि आपले!

पाकिस्तानचे पहिले फील्ड मार्शल आयुब खान यांनी स्वतःच स्वतःला हा बहुमान दिला! पुढे १९६५ युद्धात त्यांना काही लढायांत नामुष्की पत्करावी लागली. जनरल मुनीर यांनाही नामुष्कीजनक संघर्षातून फील्ड मार्शल बनवले गेले. याउलट भारतात सॅम मानेकशॉ आणि जे. एम. करिअप्पा यांना अनुक्रमे १९७१ आणि १९४७मधील युद्धांत कुशल नेतृत्व दाखवल्याबद्दल फील्ड मार्शल हुद्दा बहाल करण्यात आला. तर १९६५ युद्धात भारतीय हवाई दलाचे नेतृत्व केल्याबद्दल अर्जन सिंग यांना मार्शल ऑफ दि एअरफोर्स हुद्दा बहाल करण्यात आला. तिन्ही हुद्दे पंचतारांकित, पण युद्धांतील मर्दुमकीबद्दल देण्यात आले.

Pakistan Constitutional Amendment : भारताची डोकेदुखी वाढणार?

पहलगाम हल्ला मुनीर यांच्याच चिथावणीनंतर घडून आला. भारताला ते हिंदू राष्ट्र समजतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला चौथ्या दिवशी सपशेल नांगी टाकावी लागली, याचे शल्य त्यांच्या मनात आहे. पण याही परिस्थितीत असिम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सहभोजन घेतले, ही बाब भारताच्या दृष्टीने निराशाजनक ठरली. भारतविरोध आणि काश्मीर प्रश्न या दोनच घटकांवर पाकिस्तानात सत्तेत टिकून राहता येते, याची जाण मुनीर यांना आहे. मात्र ते सत्तेस जितके चिकटून राहतील, तितके पाकिस्तानच्या लोकशाहीचे आणि जनतेचे नुकसान होईल. अर्थात ही बाब भारतासाठीही डोकेदुखी ठरेल, कारण मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान यापुढेही भारताच्या कुरापती काढत राहील.