scorecardresearch

सव्वा लाख युक्रेनी नागरिकांचा अन्य देशांत आश्रय

 ‘आजच्या घडीला जवळपास १,१६,०० लोकांनी आंतरराष्ट्रीय सीमा पार केली आहे.

युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थी मायदेशी येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशाच विद्यार्थ्यांची एक तुकडी युक्रेनच्या झाहोयू सीमेवरून हंगरीत दाखल झाली. तेथून ती बुडापेस्टमार्गे भारतामध्ये येणार आहे.

रशियाने केलेल्या आक्रमणानंतर सुमारे १ लाख २० हजार लोक युक्रेनमधून शेजारच्या देशांमध्ये पळून गेले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने शनिवारी सांगितले.

युक्रेनच्या राजधानीवर ताबा मिळेवण्याच्या प्रयत्नासह रशिया त्या देशावर भीषण हल्ले करत असल्याने बचावासाठी आपल्या सामानासह सुटकेसाठी पळून जाणाऱ्या युक्रेनी नागरिकांची संख्या वाढत आहे.

 ‘आजच्या घडीला जवळपास १,१६,०० लोकांनी आंतरराष्ट्रीय सीमा पार केली आहे. ही संख्या वाढू शकते, ती दर मिनिटाला बदलत आहे’, असे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या उच्चायुक्तांच्या प्रवक्त्या शाबिया मंटो यांनी सांगितले. परिस्थती आणखी चिघळली तर ४० लाखांपर्यंत युक्रेनी नागरिक पळून जाऊ शकतात, अशी शक्यता या संस्थेला वाटते.

 स्थलांतर करणारे युक्रेनी नागरिक पोलंड, मोल्दोवा, हंगेरी, रुमानिया व स्लोव्हाकिया या देशांमध्ये, तर काहीजण रशियन फौजा जेथून युक्रेनमध्ये आल्या त्या बेलारूसमध्येही जात असल्याचे मंटो यांनी सांगितले. या लोकांची देशनिहाय संख्या त्या लगेच सांगू शकल्या नाहीत, मात्र सगळय़ात मोठया संख्येत लोक पोलंडमध्ये येत आहेत. रशियाने २०१४ साली पहिल्यांदा युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यापासून अलीकडच्या काही वर्षांत सुमारे २० लाख युक्रेनी नागरिक कामाच्या निमित्ताने यापूर्वीच तेथे स्थायिक झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asylum seekers quarter of a lakh million ukrainians in other countries akp

ताज्या बातम्या