कुठल्याही कंपनीमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांची त्या वर्षातील कामगिरी तसेच मागच्या काही वर्षातील त्यांची कामाप्रतीची निष्ठा लक्षात घेऊन पगारवाढ आणि प्रमोशन दिले जाते. पण आयबीएम या प्रसिद्ध कंपनीमध्ये यापुढे फक्त त्या वर्षातीलच कामगिरी लक्षात घेतली जाणार नाही तर कर्मचारी भविष्यात अजून किती चांगले काम करतात हे ध्यानात घेऊनच पगारवाढ आणि प्रमोशन दिले जाणार आहे.

कर्मचाऱ्यामध्ये किती क्षमता आहे, त्यांच्यात काय कौशल्य आहे हे जोखण्यासाठी आयबीएम वॅटसन अॅनालिटीक्स या कृत्रिम बुद्धीमता प्रणालीचा वापर करणार आहे. वॅटसन प्रणालीच्या आधारे कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि त्यांनी हाताळलेले प्रोजेक्टस याचा आढावा घेऊन तो कर्मचारी भविष्यात आयबीएमला अजून कशा प्रकारचे योगदान देऊ शकतो याचा अंदाज बांधला जाणार आहे.

त्या आधारावर कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि प्रमोशन ठरणार आहे. सध्याचे जे पारंपारिक मॉडेल आहे त्यामध्ये तुम्ही चालू नोकरीमध्ये कशी कामगिरी केलीय त्या एकमेव निकषावर तुमचे प्रमोशन ठरते असे आयबीएमच्या उपाध्यक्ष निकली लामोअरऑक्स यांनी सांगितले. आम्ही सध्याची कामगिरी लक्षात घेणारच आहोत पण त्याचवेळी भविष्यात कर्मचारी कशी कामगिरी करेल हे सुद्धा तपासणार आहोत असे निकली यांनी सांगितले. आयबीएमचे जे एचआर तज्ञ आहेत त्या तुलनेत वॅटसन प्रणाली ९६ टक्के अचूक ठरेल असा दावा आयबीएमने केला आहे. कर्मचाऱ्याने काल काय केले ते जास्त महत्वाचे नाही तर तो उद्या काय करणार हे त्यापेक्षा महत्वाचे आहे असे निकली यांनी सांगितले.