देशभरातील एटीएम यंत्रे ही नव्या नोटांचे व्यवहार करण्याच्यादृष्टीने सुसज्ज नाहीत. आवश्यक ते बदल केल्यानंतरच एटीएम यंत्रांमधून नव्या नोटांचे वितरण करता येईल, असे वृत्त ‘हिंदुस्थान टाईम्स’कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्तानुसार सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५०० आणि २००० च्या नोटांची ठेवण आणि आकार नवीन असल्याने एटीएम मशिन्समधून या नोटा वितरीत करता येणे शक्य नाही. त्यामुळे एटीएम मशिन्सची नव्या गरजांनुसार जोडणी करावी लागेल, असे सूत्रांचे म्हणजे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत एटीएम मशिन्सच्या या समस्येविषयी भाष्य केले होते. दिल्लीमध्ये बँकांना सामान वाहतुकीची सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यानेही एटीएम मशिन्सची पुनर्जोडणी करावी लागणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यासाठी प्रत्येक एटीएम केंद्रावर अभियंत्यांचे तीन ते चार तास खर्ची पडत असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरात एकच गदारोळ उडाला होता. या घोषणेनंतर सध्या बँक आणि एटीएम केंद्रांबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. एटीएम सेवा शुक्रवारपासून पूर्ववत होण्याची घोषणा करण्यात आली असली, तरीही प्रत्यक्षात अजूनही एटीएम यंत्र आणि ते चालण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा झालेल्या नसल्यामुळे अजूनही काही दिवस सगळी एटीएम सुरू होण्याची शक्यता नसल्याचे समोर आले आहे. सध्या विस्कळीत झालेली एटीएम सेवा पूर्ववत व्हायला आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. बुधवारी देशभरातील सर्व एटीएम बंद ठेवून प्रत्येक एटीएममधून या नोटा गोळा करण्यात आल्या. विविध बँकांचे एटीएम वित्तीय क्षेत्रातील खासगी कंपन्यांकडून सांभाळले जाते.
या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिवसभरात शहरांतील वेगवेगळ्या एटीएममधून संबंधित चलन काढून आणले आणि ते परत बँकांकडे जमा केले. या एटीएममध्ये गुरुवारी नव्या नोटा भरण्यात येणार होत्या; मात्र एटीएममध्ये केवळ नव्या नोटा भरून ती तातडीने सुरू होणे शक्य नसल्याचे या क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.