गोहत्या मुद्यावरुन वादा ओढावून घेणाऱ्या पंतप्रधानांनी हैदराबादमधील सभेत दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा संताप व्यक्त केला. देशात दलितांवर होणारे हल्ले हे लाजिरवाणे असून दलितांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत दलितांवरील हल्ले थांबविणाचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हवे तर मला गोळ्या घाला, पण दलितांवरील हल्ले थांबवा, या शब्दात मोदींनी दलितांवरील अत्याचारावरील संताप व्यक्त केला.  हैदराबादमधील भाजप मेळाव्यात नरेंद्र मोदी बोलत होते. दलितांवरील अत्याचार करणाऱ्यास हे जग कधीच माफ करणार नाही,असे मोदींनी म्हटले. गुजरातमधील उनामध्ये तरुणांच्या गटाकडून दलितांना मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. गुजरातमधील सत्ता नुकत्याच झालेल्या सत्ता परिवर्तनामधील दलितांवरील अत्याचाराची घटना देखील कारणीभूत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याप्रकरणानंतर मोदींने पहिल्यांदा आपले मौन सोडत गोहत्या प्रकरणावर भाष्य केले होते. तथाकथित गोरक्षकांपैकी ८० टक्के लोक रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर कामे करतात आणि दिवसा गोरक्षक बनतात. अशा भाषेत त्यांनी गोरक्षकांला सुनावले होते. मोदींनी केलेल्या विधानांवर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उत्तर प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश यासह देशात निरनिराळ्या राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी गाईंचे संरक्षण करण्याच्या नावावर दलित व मुस्लिमांना मारहाण केल्याच्या घटनांबाबत मोदी सरकार व भाजप यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता. या टीकाकारांना मोदींनी हैदराबादच्या व्यासपीठावरुन उत्तर दिले आहे.