मोदींच्या वाढदिवसानिमित्त होणार १३०० भेटवस्तूंचा लिलाव, नीरज चोप्राने दिलेल्या भाल्याचाही समावेश!

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून पुढील तीन आठवड्यांसाठी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

auction-of-1300-gifts-occasion-of-narendra-modi-birthday-javelin-given-by-neeraj-chopra-gst-97
मोदींच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा देशभरात खास कार्यक्रम आयोजित करत आहे. (Photo : ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभरात अनेक खास कार्यक्रमांचं आयोजन करत आहे. आजपासून म्हणजेच १७ सप्टेंबरपासून पुढील तीन आठवड्यांसाठी देशभरात वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमांची सुरुवात रक्तदान शिबिरापासून होईल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या उपक्रमाचं उदघाटन होणार आहे. त्याचसोबत, मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक छायाचित्र प्रदर्शन देखील आयोजित केलं जाणार आहे. ज्यात पंतप्रधान मोदींचं जीवन छायाचित्रांमार्फत दाखवलं जाईल.

लसीकरण मोहिमेवर भर

१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत पक्षाचे कार्यकर्ते देशभरात करोना लसीकरणाची मोहीम राबवतील. या उपक्रमात पक्षाचे कार्यकर्ते जनतेमध्ये जातील आणि २० दिवसांत ‘सेवा आणि समर्पण’ मोहिमेत सामील होतील. जास्तीत जास्त लोकांना करोनाची लस घेण्यास प्रवृत्त करतील. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला किमान १० ते १५ लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं लक्ष्य देण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी लसीकरण मोहीम बळकट करण्याचं आवाहन केलं आहे.

१३०० भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय संस्कृती मंत्रालय मोदींना मिळालेल्या १३०० भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचाही ई-लिलाव करणार आहे. महिन्याभरापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी, या खेळाडूंनी मोदींना भेटवस्तू म्हणून स्पोर्ट्स गियर आणि उपकरणं दिली होती. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पंतप्रधान मोदींना आपलं बॅडमिंटन रॅकेट तर सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने भाला भेट दिला होता. याचसोबत, पंतप्रधान मोदींनी मिळालेली राम मंदिराची प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर मॉडेल, काही शिल्पं, सादर केलेली चित्रं आणि अंगवस्त्र देखील या लिलावात ठेवण्यात आल्या आहेत.

इथे होणार लिलाव

१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान pmmementos.gov.in वर हा ई-लिलाव केला जाईल. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने म्हटलं आहे की, या लिलावातून जो काही निधी मिळेल तो गंगा नदीच्या संवर्धनासाठी चालवल्या जाणाऱ्या ‘नमामी गंगे’ मिशनसाठी वापरला जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Auction of 1300 gifts occasion of narendra modi birthday javelin given by neeraj chopra gst

ताज्या बातम्या