Bahadur Shah Zafar Painting blackened as Aurangzeb: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून निदर्शने सुरू आहेत. अशात हा वाद आता उत्तर प्रदेशातील गाझियाबादपर्यंत पोहोचला आहे. गाझियाबाद रेल्वे स्थानकावर औरंगजेबाचे चित्र असल्याचे समजून हिंदू रक्षा दलाच्या अध्यक्षा पिंकी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बहादूर शाह जफर यांच्या चित्राला काळे फासले.

रेल्वे अधिकारी म्हणाले, कारवाई करणार

उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाचे डीआरएम पुष्पेश रमण त्रिपाठी यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार हे चित्र औरंगजेबाचे नसून बहादूर शाह जफरचे यांचे होते. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे योग्य नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात आहे.

“ज्या चित्राला काळे फासण्यात आले आहे, ते चित्र औंरगजेबचे नसून बाहदूर शाह जफर यांच आहे. त्यांनी १८५७ च्या लढाईत मोठे योगदान दिले होते. त्यांच्या चित्राला काळे फासून यांनी जे काही केले ते योग्य नाही. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा त्याचे विद्रुपीकरण करणे चुकीचे आहे. त्यामुळे आरोपींवर कारवाई करण्यात येईल”, असे डीआरएम पुष्पेश रमण त्रिपाठी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.

गाझियाबाद रेल्वे स्थानकावर काय घडले?

गाझियाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या सुशोभीकरणासाठी अनेक वर्षांपूर्वी चित्रे काढली आहेत. ही चित्रे स्वातंत्र्यसैनिकांची आहेत, ज्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे आणि बहादूर शाह जफर यांच्या चित्राचाही समावेश आहे. दरम्यान, हिंदू रक्षा दलाने औरंगजेब समजून बहादूर शाह जफर यांच्या चित्राला काळे फासले.

हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी ज्या चित्राला काळे फासले, ते चित्र औरंगजेबाचे नव्हते तर बहादूर शाह जफर यांचे होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचेही पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी

दरम्यान फेब्रुवारीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करत औरंगाबादमध्ये असलेली औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. ही मागणी करणाऱ्यांमध्ये राज्यातील विविध संघटनांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.