Australian Woman post on Diwali: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. जगभरात जिथे जिथे भारतीय नागरिक गेले आहेत, तिथेही त्यांनी आपापल्यापरिने दिवाळीचा उत्सव साजरा केला. मात्र काही देशांमध्ये दिवाळीच्या सणावरून स्थानिकांचा रोष पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीयांनी घराबाहेर दिव्यांचे तोरण लावून दिवाळीचा सण साजरा केला. याचा एक व्हिडीओ पोस्ट करत ऑस्ट्रेलियन महिलेने टीका केली होती. या महिलेला सध्या ट्रोल करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेतील राजकारणी, डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि भारतीय वंशाचे नागरिक काश पटेल यांनाही दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला. एफबीआय संस्थेचे अध्यक्ष असलेल्या काश पटेल यांना तर सर्व हिंदूंना हद्दपार करा, अशी टोकाची टीका सहन करावी लागली.

सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिले?

त्याचप्रमाणे आता कोबी थॅचर या महिलेने दिवाळीबाबत एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमुळे वाद उद्भवला आहे. थॅचर यांनी सिडनीतील एका वसाहतीचा व्हिडीओ शेअर केला, ज्यात दिवाळीनिमित्त घराबाहेर रोषणाई केलेली दिसत आहे. या व्हिडीओसह लिहिलेल्या पोस्टमध्ये थॅचर म्हणाल्या, ही घरे ख्रिसमससाठी उजळलेली नाहीत. ती दिवाळीसाठी उजळलेली आहेत. निरिंबा फिल्ड्स या परिसरात जवळजवळ प्रत्येक घर भारतीय नागरिकाचे आहे. पश्चिमेकडील देशांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आपण आपली संस्कृती गमावण्याआधी जपली पाहिजे.

थॅचर यांच्या या पोस्टवर अनेक भारतीय नागरिकांनी टीकेचा सूर लावला. तसेच त्यांचा निषेधही व्यक्त केला. यानंतर थॅचर यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली.

या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “ऑस्ट्रेलियातील काही हिंदू आता दिवाळीला अधिकृत सार्वजनिक सुट्टी बनविण्यासाठी मागणी करत आहेत. नाही, पण हे ऑस्ट्रेलिया आहे, भारत नाही. तुम्ही ज्या देशाला सोडून इथे आलात त्याचे प्रतिबिंब आम्ही आमच्या देशात उमटू देणार नाहीत.”

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

थॅचर यांच्या पोस्टवर अनेक भारतीयांनी टीका केली. एका युजरने लिहिले, “ऑस्ट्रेलियाला आपले घर म्हणून स्वीकारणारे आणि ऑस्ट्रेलियन जीवनशैली स्वीकारणाऱ्या कष्टाळू लोकांचे हे सर्वोत्त उदाहरण आहे. ते शांततेने आणि कायदा पाळून राहतात. स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देतात. महत्त्वाचे म्हणजे भारतीय लोक सर्व सण साजरे करतात.” या कमेंटला उत्तर देताना थॅचर म्हणाल्या, जर दुसऱ्या देशात राहण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांनी त्या त्या देशाच्या संस्कृतीशी जुळवून घेतले पाहिजे, आपली संस्कृती आयात करू नये.

यावर आणखी एका युजरने लिहिले की, हॅलोविनचा तुम्हाला त्रास होत नाही का? त्यावर थॅचर म्हणाल्या, हो, हाही सण ऑस्ट्रेलियाचा नाही, तर अमेरिकेचा आहे. या सणाला मी घराचा पुढचा दरवाजा बंद ठेवते आणि घरात नसल्याचे दाखवते.

शिमोन जोशी नामक युजरने म्हटले की, मी सहसा ऑनलाइन वादात पडत नाही. पण मला यावेळी बोलावेसे वाटते. भारतीय समुदाय दिवाळीप्रमाणेच ख्रिसमसही साजरा करतो. प्रत्येक भारतीय घरात ख्रिसमस ट्री आहेत. आम्ही तुमच्या संस्कृतीचे समर्थन करतो आणि त्यात योगदानही देतो. तुम्ही दुर्दैवाने चुकीच्या गटाला लक्ष्य करत आहात.