१९९९ च्या विश्वचषकानंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना पहिला पराभव पत्करावा लागणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आता बुधवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. पावसामुळे रद्द झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानचा संघही विजयी सातत्य कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.

अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला नमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रोखली. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. भारताचे भलेमोठे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जिकिरीचे प्रयत्न केले. पण कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलेले नव्हते. अशातच महत्त्वाच्या क्षणी बळी गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले.

दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा ५-० असा धुव्वा उडवला होता. आता त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक आहे. सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करली होती. त्यानंतर मात्र विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत करत पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी केली होती. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धचा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता. आता इंग्लंडविरुद्ध केलेल्या जोशपूर्ण कामगिरीचा नमुना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धही पेश करण्यासाठी पाकिस्तान संघ उत्सुक आहे.

दुखापतग्रस्त स्टॉइनिसच्या जागी मार्शचा समावेश

टॉँटन : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्क्स स्टॉइनिसच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. तसेच ही दुखापत किती काळ चालेल, त्याबाबत शाश्वती नसल्याने संघव्यवस्थापनाने त्याच्या जागेवर दुसरा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याचा संघात समावेश केला आहे.

स्टॉइनिसच्या तंदुरुस्तीबाबत यापुढील श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी आढावा घेऊन मग निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठीच मार्शला लंडनमध्ये बोलावण्यात आले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’च्या नियमानुसार जर बदली खेळाडू सामना खेळला तर संघातील मूळ दुखापतग्रस्त खेळाडू तंदुरुस्त झाला तरी त्याला पुढील स्पर्धेत खेळवता येणार नाही. त्यामुळे आता स्टॉइनिस तंदुरुस्त होण्यापूर्वी कोणत्याही सामन्यात मार्शला ऑस्ट्रेलियाने खेळवले तर स्टॉइनिस संघात पुन्हा परतणे अशक्य होणार आहे.

वॉर्नरच्या धीम्या फलंदाजीची ऑस्ट्रेलियाला चिंता

जवळपास वर्षभराच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने गेल्या तीनपैकी दोन सामन्यांत अर्धशतकी खेळी साकारली आहे. मात्र धीम्या गतीने त्याने केलेल्या फलंदाजीमुळे कर्णधार आरोन फिंचची चिंता वाढली आहे. भारताविरुद्ध वॉर्नरने ५ चौकारांसह ५६ धावा फटकावण्यासाठी ८४ चेंडू घेतले, त्यामुळेच अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर वाढत गेला. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने नाबाद ८९ खेळी करत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. पण त्यासाठी त्याला ११४ चेंडूंचा सामना करावा लागला होता.

मॅक्सवेलला सूर गवसणार?

कोणत्याही चेंडूला सीमारेषेपार भिरकावण्याची तसेच कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेला ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला अद्याप म्हणावा तसा सूर गवसलेला नाही. तिन्ही सामन्यांत मॅक्सवेलला फलंदाजीत चमक दाखवता आलेली नाही. मात्र पाकिस्तानविरुद्ध मॅक्सवेलने नेहमीच चांगली कामगिरी करत ५५च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. गेल्या तीन सामन्यांत त्याने तिन्ही वेळा ७१, ९८ आणि ७० धावा फटकावत सामना जिंकून देणारी खेळी केली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध तरी मॅक्सवेलला सूर गवसेल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाला आहे.

सामना क्र. 17

ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान

स्थळ : कूपर कौंटी मैदान, टाँटन   ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १, स्टार प्रवाह मराठी.

संघ

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार व यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

पाकिस्तान : सर्फराझ अहमद (कर्णधार व यष्टिरक्षक), इमाम-उल-हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, इमाद वसिम, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हसनैन.

आमनेसामने

एकदिवसीय

सामने : १०३, ऑस्ट्रेलिया : ६७, पाकिस्तान : ३२, टाय / रद्द : १/३

विश्वचषकात

सामने : ९, ऑस्ट्रेलिया : ५, पाकिस्तान : ४, टाय / रद्द : ०