पीटीआय, उत्तरकाशी : उत्तरकाशीतील हिमस्खलनाच्या दुर्घटनास्थळी आणखी दहा जणांचे मृतदेह सापडले. त्यामुळे आतापर्यंत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे. तीन प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अद्याप बेपत्ता आहेत. ‘नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनिअिरग’ ने (एनआयएम) शुक्रवारी ही माहिती दिली. या शोधमोहिमेत मदत करण्यासाठी उत्तराखंडमधील हर्षिल येथून भारतीय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी गिर्यारोहकांची एक तुकडी उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री भागातील ‘द्रौपदी का दांडा-२’ शिखरावर १७ हजार फूट उंचीवर चढाई करून परतत होती. त्यावेळी हिमस्खलनाची दुर्घटना घडली. ‘एनआयएम’कडून सांगण्यात आले, की गुरुवारी संध्याकाळी उशिरा हिमस्खलन स्थळावरून तीन मृतदेह व शुक्रवारी सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत एकूण २६ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे संस्थेने सांगितले. यापैकी २४ प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक व दोन प्रशिक्षक आहेत. तीन प्रशिक्षणार्थी अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतून बचावलेले प्रशिक्षक नायब सुभेदार अनिल कुमार यांनी गुरुवारी सांगितले की हिमस्खलनादरम्यान ३३ गिर्यारोहकांनी दोन हिमखंडाच्या भेगांमध्ये आश्रय घेतला होता.

संस्थेने सांगितले की, गुरुवारी १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला यांनी सांगितले की, मतली येथे आणले जाणारे चार मृतदेह खराब हवामानामुळे हर्षिल हेलिपॅडवर नेण्यात आले, तेथून त्यांना रुग्णवाहिकेने उत्तरकाशीला पाठवण्यात आले. अद्याप सर्व मृतदेहांची ओळख पटलेली नाही. ओळख पटलेल्यांच्या नातलगांना कळवण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने शोधकार्यात अडथळे येत असले तरी जमिनीवरील शोधमोहीम अविरत सुरू आहे. लष्कर, हवाई दल, एनआयएम, इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दल, हाय अल्टिटय़ूड वॉरफेअर स्कूल, आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल आणि जिल्हा प्रशासन शोधमोहिमेत सहभागी आहेत. हिमस्खलनात बेपत्ता झालेले गिर्यारोहक हे प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी ‘एनआयएम’ने निवडले होते.

अतिवृष्टीचा इशारा

उत्तरकाशीसह उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क आहेत. खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avalanche death toll 26 three trainee climbers still missing ysh
First published on: 08-10-2022 at 00:02 IST