IPS officer NV Baramani Retirement: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एप्रिल महिन्यात एका मोर्चात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधीक्षकावर हात उगारला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर विरोधकांनी टीका केली. मात्र याचा धसका संबंधित पोलीस अधिकाऱ्यानेच अधिक घेतला. अतिरीक्त पोलीस अधिक्षक एनव्ही बारमणी यांनी या घटनेनंतर जूनमध्ये स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर अद्याप कर्नाटक सरकारने निर्णय घेतलेला नाही.

बारमणी यांनी १४ जून रोजी गृह सचिवांना पत्र लिहून २८ एप्रिलच्या घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केले. काँग्रेसतर्फे महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजपाच्या महिला कार्यकर्त्या थेट स्टेजवर आल्या. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केल्याने संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक बारमणी यांच्यावर भरसभेतच हात उगारला.

बारमणी यांनी गृह सचिवांना लिहिलेल्या पत्रात या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे म्हटले. त्यांनी लिहिले की, सिद्धरामय्या सर्वांसमोर माझ्या अंगावर धावून आले. इथला एसपी कोण आहे? असे म्हणून त्यांनी माझ्यावर हात उगारला. मी तात्काळ मागे हटलो त्यामुळे त्यांची थापड चुकविण्यात यशस्वी झालो. मी थापड जरी चुकवली असली तरी माझी बदनामी मात्र थांबवू शकलो नाही.

मी थापड चुकवली पण बदनामी रोखू शकलो नाही

बारमणी म्हणाले की, या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. दोन दिवस सर्व वाहिन्यांवर हाच व्हिडीओ दाखवला गेला. मोर्चातही हजारो लोकांनी हा प्रसंग पाहिला. या घटनेनंतर मी शांतपणे स्टेजवरून खाली उतरलो. कारण मला पोलीस दलाची प्रतिष्ठा आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा आदर ठेवायचा होता.

कुटुंबातील सदस्य दुःखात

बारमणी म्हणाले की, या घटनेनंतर मी घरी आल्यावर माझ्या घरात स्ममानशांतता पसरली होती. पत्नी आणि मुलांना जबर धक्का बसला होता. या घटनेनंतर एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने मला फोन केला नाही. मला वाळीत टाकल्यासारखे वाटले. तसेच या घटनेनंतर मला विभागीय बैठकांमध्ये अस्वस्थ वाटू लागले आहे. मी माझे कर्तव्य पार पाडू शकत नाही, अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.

मी ३१ वर्ष कर्नाटक पोलीस दलाची प्रामाणिकपणे सेवा केली. मी ज्याप्रमाणे आईवर प्रेम केले, त्याचपद्धतीने मी माझ्या गणवेषावरही केले. गणवेषाप्रती माझे नाते अतिशय भावनिक आणि पवित्र असे आहे, असेही बारमणी पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती

बारमणी यांनी राजीनाम्यासह भावनिक पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा निर्णय बदलण्याची समजूत घातली. सिद्धरामय्या यांनी स्वतः बारमणी यांची भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यानची माहिती बाहेर येऊ शकलेली नाही.