Ram Mandir Ayodhya Features : बहुप्रतिक्षित राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्रामप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. तर, काहीजण आताच जाऊन अयोध्येतील भव्य निर्माणाधीन राम मंदिर पाहून येत आहेत. १०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता तो संपुष्टात आला असून आता रामाच्या भेटीची आस रामभक्तांना लागली आहे. त्यामुळे झोपडीत राहिलेल्या रामासाठी अतिभव्य अशा राम मंदिराची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. हे अतिभव्य राममंदिर कसे असेल, या मंदिराची वैशिष्ट्य काय याबाबत श्री रामजन्म भूमी तीर्थक्षेत्र संस्थेने माहिती दिली आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळीचा माहौल आहे. तसंच, २२ जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव चंपत राय यांनी २२ जानेवारी या दिवसाची तुलना १५ ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनासह केली होती. चंपत राय ANI च्या अहवालात म्हणाले होते की, “२२ जानेवारी हा दिवस १५ ऑगस्ट इतकाच महत्त्वाचा आहे. कारगिल युद्धाप्रमाणे तसेच १९७१ च्या युद्धाप्रमाणे या दिवसाचे महत्त्व सुद्धा मोठे आहे. देशभरातील लोकांमध्ये राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक सोहळ्याबाबत समाधानाची भावना दिसून येते. हे मंदिर भारताला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे. या लहानश्या शहरापुरता मर्यादित राम मंदिराचा आनंद आता देशाच्या अभिमानाचा, सन्मानाचा मुद्दा झाला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी तारीखच का निवडली? महंतांनी सांगितला खास योगायोग

राम मंदिराचं वैशिष्ट्य काय?

  • राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं जात आहे.
  • मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) ३८० फूट, रूंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.
  • मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील.
  • मुख्य गाभाऱ्यात प्रभु श्रीरामाचं बालरुप मूर्ती असेल. तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल.
  • मंदिरात ५ मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप असणार आहेत.
  • खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती असणार आहेत.
  • सिंहद्वारापासून ३२ पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश होईल.
  • दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • मंदिराच्या चारही बाजूंना आयातकार तटबंदी असणार आहे. चारही दिशांना याची एकूण लांबी ७३२ मीटर आणि रुंदी १४ फूट असणार आहे.
  • तटबंदीच्या चारही कोनांना सूर्यदेव, आई भगवती, गणपती, भगवान शिव यांना समर्पित चार मंदिरे बांधण्यात येणार आहे. उत्तरेला अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर असणार आहे.
  • मंदिराजवळ पौराणिक सीताकूप असणार आहे.
  • मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजेच महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरेही असणार आहेत.
  • दक्षिण-पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे.
  • मंदिरात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. जमिनीवर काँक्रीटीकरणही करण्यात आलेलं नाही.
  • मंदिराच्या खाली १४ मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे.
  • मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा २१ फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे.
  • मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे, जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंबित्व राहील.
  • २५ हजार क्षमतेचे यात्रेकरू सुविधा केंद्र बांधले जात आहे, जेथे यात्रेकरूंचे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर असतील.
  • मंदिर परिसरात स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसिन, उघडे नळ आदी सुविधाही असतील.
  • मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे. एकूण ७० एकर क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र कायम हिरवेगार राहील.