Fake Birth Certificate Case : उत्तर प्रदेशमधील माजी मंत्री आणि समाजवादी पार्टीचे सरचिटणीस आझम खान आणि त्यांच्या कुटुंबासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात रामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आझम खान, त्यांची पत्नी जन्जीम फातिमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांना दोषी ठरवलं आहे. तसेच तिघांनाही सात-सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या तिघांचीही न्यायालयातून थेट तुरुंगात रवानगी केली जाईल, असं सांगितलं जात आहे. अब्दुल्ला आझम खान यांच्या जन्म प्रमाणपत्राशी संबंधित प्रकरणात भाजपा नेते आकाश सक्सेना यांनी २०१९ मध्ये न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर रामपूर न्यायालयाने आज (१८ ऑक्टोबर) निकाल दिला.

विशेष सरकारी वकील अरुण कुमार यांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांना सांगितलं की अब्दुल्ला आझम खान यांच्या जन्म प्रमाणपत्राच्या दोन खटल्यांमध्ये अब्दुल्ला आझम आणि त्यांच्या आई-वडिलांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अब्दुल्ला आझम यांच्याविरोधात गंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वकील अरुण कुमार म्हणाले, अब्दुल्ला आझम यांच्याकडे दोन जन्म प्रमाणपत्रं असल्याचा आरोप करण्यात आला होता. यापैकी एक जन्म प्रमाणपत्र जानेवारी २०१५ मध्ये लखनौ नगरपालिकेने बनवलेलं होतं, तर दुसरं रामपूरमधील आहे. जे २८ जून २०१२ मध्ये रामपूर नगरपालिकेने बनवलं होतं. ही वेगवेगळी जन्म प्रमाणपत्रं वेगवेगळ्या कामांसाठी आपल्या सोयीनुसार वापरण्यात आली असल्याचा अब्दुल्ला आझम यांच्यावर आरोप आहे.

हे ही वाचा >> गाझामधल्या रुग्णालयातील स्फोटात ५०० बळी, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या हल्ल्यामागे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अब्दुल्ला यांच्यांवर खोट्या जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर पासपोर्ट बनवून परदेश दौरे करणे आणि दुसऱ्या जन्म प्रमाणपत्राचा वापर हा सरकारी कामांसाठी केल्याचा आरोप आहे. दोन्ही जन्म प्रमाणपत्रं बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपा नेत्याच्या तक्रारीनंतर अब्दुल्ला आझम, आझम खान, तन्जीम फातिमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे.