B Sudershan Reddy on Vice-Presidential election : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर येत्या ९ सप्टेंबर रोजी या पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाप्रणित एनडीएकडून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर सुदर्शन रेड्डी यांनी सर्व पक्षांकडे पाठिंबा मागितला आहे. रेड्डी यांनी तटस्थ असलेल्या व एनडीएतील पक्षांना आणि नेत्यांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले, “मी सर्व पक्षांना मला पाठिंबा देण्याचं आवाहन करतो. मी एनडीएतील घटक पक्षांना देखील पाठिंबा देण्याचं आवाहन करतो.” काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एम. अन्नादुराई आणि बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर चर्चा झाली होती. या बैठकीत इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची रेड्डी यांच्या नावावर सहमती झाली. त्यानंतर खरगे यांनी रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
बी. सुदर्शन रेड्डी यांच्या निवडीबाबत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “रेड्डी हे देशातील सर्वात प्रतिष्ठित व प्रगतीशील कायदेतज्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे प्रदीर्घ कायदेशीर कारकिर्दीचा अनुभव आहे, ज्यामध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे.
कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी?
७८ वर्षीय सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. सुदर्शन रेड्डी यांनी हैदराबाद येथे वकील म्हणून त्यांच्या कायदेशीर कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. रेड्डी यांनी डिसेंबर १९७१ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये वकिली केली. तसेच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सिव्हिल प्रकरणांमध्ये वकिली केलेली आहे. त्याचबरोबर १९८८ ते १९९० या दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून सुदर्शन रेड्डी यांनी काम पाहिलं आहे.