‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांचे आवाहन
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन आपण का केले याचे स्पष्टीकरण योगगुरू रामदेव बाबा यांनी दिले आहे. भारतात चिनी वस्तूंची विक्री करून चीन बक्कळ पैसा कमावते आणि पाकिस्तानला मदत करते, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
मंगळवारी ‘एक्स्प्रेस अड्डा’मध्ये रामदेव बाबांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या नॅशनल ओपिनियन एडिटर वंदिता मिश्रा यांनी रामदेव बाबांशी संवाद साधला. न्यायाच्या तत्त्वानुसार आपण वरील विधान केले आहे आणि चीनवर सामाजिक-आर्थिक दबाव टाकण्याचा आपला उद्देश आहे, असे ते म्हणाले.
रामदेव बाबा यांनी आपली मते स्पष्टपणे व्यक्त केली असली तरी पाकिस्तानमध्ये योग शिबिरे आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे, कारण योग हीसुद्धा एक कला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या कलावंतांप्रमाणे तेथून आपल्याला नफा आणावयाचा नाही. त्या पैशातून आपण पाकिस्तानातील जनतेचे कल्याण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
लक्ष्यभेदी कारवाईबद्दल रामदेव बाबा म्हणाले की, दुष्टांचा संहार करणे म्हणजे हिंसाचार नाही. मोदी यांनी दाऊद इब्राहिम, मसूद अझर आणि हाफीज सईद यांचाही नाश करावा म्हणजे जनतेच्या मनात मोदींबद्दल काळा पैसा आणि गरिबी हटावबाबत जो आकस आहे तो जनता विसरेल. मोदी यांनी बुद्ध आणि युद्ध याबाबत एकाच वेळी बोलावे, क्रांतीविना शांती येऊच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यापैकी कोणाला राजकीय भवितव्य आहे, असे विचारले असता रामदेव बाबा म्हणाले की, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मात्र प्रियंकामध्ये आपल्याला अधिक गुण दिसतात.
कलाकारांना फक्त चित्रपटांबद्दल काळजी
पाकिस्तानच्या कलावंतांवर बंदी घालण्याबाबत विचारले असता रामदेव बाबा म्हणाले की, कलावंत म्हणजे दहशतवादी नव्हेत, मात्र त्यांच्याकडे आत्मा आहे की नाही? त्यांना केवळ आपल्या चित्रपटांबद्दल काळजी वाटत आहे, ते कोटय़वधी रुपये कमावतात आणि बिर्याणीवर ताव मारतात. उरी आणि अन्य ठिकाणी भारतीयांची निर्घृण हत्या करण्यात आली त्याबद्दल ते साधा निषेधही का नोंदवत नाहीत, असा सवाल रामदेव बाबा यांनी केला.