६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली. तसंच त्याआधी राम मंदिर आंदोलन हे रथयात्रेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलं होतं. त्यासाठी कारसेवाही करण्यात आली. बाबरी पडल्यानंतर भारतात त्याचे पडसादही उमटले होते. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्या ठिकाणी आता मंदिर उभं राहतं आहे. अशात एआयएमआयमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामुळे वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. त्या जागी मंदिर होतं हा उल्लेख महात्मा गांधींनीही केला नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत ओवैसी?
“५०० वर्षांपासून मुस्लिम बाबरी मशिदीत नमाज पठण करत होते. काँग्रेसचे तेव्हा मुख्यमंत्री असलेले जी. बी. पंत यांनी रात्रीच्या अंधारात तिथे मूर्ती ठेवल्या. बाबरी माझी मशीद होती, आहे आणि राहणार. मात्र मूर्ती काढण्यात आल्या नाहीत. त्यानंतर नायर नावाचे वकील होते त्यांनी मूर्ती पूजा सुरु केली. त्यानंतर ते जनसंघाकडून खासदार झाले. १९८६ मध्ये मशिदीचं टाळं उघडण्यात आलं. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी भाजपाने पाडली. हा मुद्दा भाजपाकडे १९८९ मध्ये आला. विश्व हिंदू परिषदेची स्थापना तेव्हा राम मंदिर कुठे होतं? महात्मा गांधींनीही तिथे राम मंदिर असल्याचा उल्लेख केला नाही. नथुराम गोडसेने जेव्हा त्यांची हत्या केली तेव्हा ते हे राम म्हणाले होते.”
हे पण वाचा- ‘सोन्याचा धनुष्य-बाण, दशावतार आणि…’; ‘ही’ आहेत रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्यं!
बाबरी आमच्याकडून हिसकावून घेण्यात आली
“संपूर्ण भारताच्या मुस्लिमांकडून बाबरी मशीद पद्धतशीरपणे हिसकावून घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे की विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या मुद्द्यावर आम्ही ही जागा मुस्लिमांना देऊ शकणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने हेदेखील म्हटलं आहे की तिथे असलेलं मंदिर तोडून मशीद बांधण्यात आली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात हे म्हटलं आहे. हा निकाल आल्यानंतर इतर मुद्देही सुरु होतील. संघ परिवार हेच सांगतोय की या ठिकाणी मशीद नव्हती.”
स्वतःला सेक्युलर समजतात त्यांना माझे प्रश्न आहेत
“जी.बी. पंत यांनी तिथून मूर्ती हटवल्या असत्या तर हा दिवस आला असता का? ६ डिसेंबरला बाबरी पाडण्यात आली नसती तर हा दिवस आला असता? याची उत्तरं कुणीही देत नाही. जे स्वतःला सेक्युलर समजतात त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. सगळ्यांना मतं हवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांना हे दाखवून देत आहेत की तुमची भारतीय राजकारणात काय जागा आहे. “असं वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गी या ठिकाणी असदुद्दीन ओवैसी यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ओवैसी यांनी हे वक्तव्य केलं आहे.