Backbencher In Kerala School: केरळमधील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या नव्या व्यवस्थेमुळे “बॅकबेंचर्स” ही संकल्पना संपुष्टात येत आहे. यामुळे वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्या बाकावर बसायची संधी मिळत आहे. दक्षिण केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील वालाकोम येथील रामविलासोम व्यावसायिक उच्च माध्यमिक शाळेने बदललेली विद्यार्थ्यांची वर्गात बसण्याची व्यवस्था नवोपक्रमाचे एक मॉडेल ठरत आहे, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणे शिक्षकांसाठी सोपे झाले आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट ‘स्थानार्थी श्रीकुट्टन’ पासून प्रभावित होऊन, शाळेने विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण यू किंवा व्ही आकाराची बसण्याची व्यवस्था आणली आहे. ज्यामध्ये सर्व बाके एका रांगेत चार भिंतींना चिटकून ठेवली जातात, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी पहिल्या बाकावर बसू शकेल.

या निर्णयामुळे पंजाबमधील एका शाळेसह केरळमधील इतर सात शाळांना विद्यार्थ्यांची ही नवी बसण्याची व्यवस्था स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली आहे. इतर अनेक शाळांनीही ही व्यवस्था स्वीकारण्यात रस दाखवला आहे.

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक विनेश विश्वनाथन यांनी केरळमधील शाळांच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि म्हणाले, “मुख्याध्यापकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहिल्यानंतर पंजाबमधील एका शाळेनेही विद्यार्थ्यांसाठी ही आसन व्यवस्था स्वीकारल्याचा मेसेज आला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना हा चित्रपटही दाखवला आहे. या चित्रपटामुळे राष्ट्रीय स्तरावर या मुद्द्याचे लक्ष वेधले गेले, याचा मला आनंद आहे”. असे वृत्त वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे.

दिग्दर्शक विनेश विश्वनाथन यांच्या मते, चित्रपटात फक्त एकच दृश्य होते, ज्यामध्ये सातवीच्या एका विद्यार्थ्याला शेवटच्या बाकावर बसल्यामुळे अपमान सहन करावा लागल्यानंतर, त्याने ही कल्पना प्रत्यक्षात आणली होती.

“ही कल्पना आमची नाही, परंतु जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्गात अशी बसण्याची व्यवस्था पूर्वी होती आणि आपल्याला कुठेतरी मध्येच याचा विसर पडला होता”, असे दिग्दर्शक विनेश विश्वनाथन म्हणाले.

केरळचे मंत्री के. बी. गणेश कुमार, ज्यांचे कुटुंब रामविलासोम व्यावसायिक उच्च माध्यमिक शाळा चालवते, त्यांनी हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक वर्ष आधी त्याचा प्रिव्ह्यू पाहिला होता आणि शाळेत हा प्रयोग करण्याच्या शक्यतेवर शिक्षकांशी चर्चा केली होती.

“गणेश कुमार यांनी आमच्याशी आणि शाळेचे व्यवस्थापन करणाऱ्या त्यांच्या पत्नीशी यावर चर्चा केली. आम्ही एकाच वर्गात ते सुरू करण्याचेही मान्य केले. आम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर सर्व कनिष्ठ प्राथमिक वर्गात ही आसन व्यवस्था सुरू केली”, असे आरएमव्हीएचएसएसचे मुख्याध्यापक सुनील पी. शेखर यांनी पीटीआयला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, या आसन व्यवस्थेमुळे शिक्षक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडे समान लक्ष देऊ शकतात. शिवाय, यामुळे बॅकबेंचर्सची संकल्पना दूर झाली आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या बाकावर बसण्याची संधी निर्माण झाली.