चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा यांच्यावर हल्ला करण्यात आला असून चेहऱ्यावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला. भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. ‘आश्रम-३’ या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन हैदोस घातला. त्यांनी चित्रीकरणस्थळी तोडमोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली.

तेथे उपस्थित काहीजणांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केले असून यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन हैदोस घालताना दिसत आहेत. यावेळी एकाला मारहाण केली जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हिंदूंची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाने या वेबसीरिजचे चित्रीकरण चालू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. या वेब सीरिजचं नाव बदलण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते यावेळी ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते.

“त्यांनी आश्रम १, आश्रम २ तयार केला आणि आता तिसऱ्या सीझनची शूटिंग करत आहेत. महिलावंर गुरु अत्याचार करत असल्याचं त्यांनी यामध्ये दाखवलं आहे. चर्च किंवा मदरसावर असा चित्रपट करण्याची हिंमत त्यांच्यात आहेत का? ते स्वत:ला कोण समजतात?,” अशी विचारणा बजरंग दलाचे सुशीस सुरहेले यांनी केली आहे.

“बजरंद दल त्यांना आव्हान देत आहे की, आम्ही त्यांना शूटिंग करु देणार नाही. आम्ही सध्या फक्त प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली आहे. आम्ही बॉबी देओलच्या शोधात आहोत. त्याने आपल्या भावाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. त्याने किती देशभक्तीपर चित्रपट काढले आहेत,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रकाश झा यांच्या टीमकडून कोणीही अद्याप तक्रार दिली नसली तरी सहभागी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. “शूटिंगमध्ये बाधा आणणाऱ्या आणि संपत्तीचं नुकसान करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. त्यांना अटक केलं जाणार,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.