अमेरिकेतील बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज मंगळवारी पहाटे कोसळला. या पूलाला एका मोठ्या जहाजाने धडक दिली. धडकेमुळे हा पूल पत्त्यांसारखा कोसळला. सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री हा अपघात घडला. एक मालवाहू जहाज या नदीतून जात असताना पुलाच्या कठड्याला धडकलं. परिणामी जहाजालाही आग लागली असून हे जहाज पाण्यात बुडालं. तर, पूल नदीत कोसळला आहे. पुलावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली असल्याची शक्यता आहे. परिणामी जीवितहानीचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. परंतु, याबाबत अधिकृत खुलासा आलेला नाही.

मेरीलँड ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटी (एमटीए) यांनी सांगितले की, पूल कोसळल्याने सर्व वाहतूक बंद केली गेली आहे. तसंच, या अपघातातील जखमींची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. १.६ मैल, चार पदली पूल पॅटापस्को नदीवर उभारण्यात आला आहे. बाल्टिमोर बंदरासाठी हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज मानला जातो.

“मला सकाळी १.३५ वाजता यासंदर्भातील माहिती मिळाली. कामगार शक्यतो पाण्यात अडकले असावेत”, डिटेक्टिव्ह निकी फेनॉय यांनी एका निवेदनात सांगितले. पुलाखाली सिंगापूर-ध्वज असलेले दाली नावाचे कंटेनर जहाज असल्याचे जहाज निरीक्षण वेबसाइट मरीन ट्रॅफिकने म्हटलं आहे.