दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून साऱ्या विश्वातून प्रार्थना करण्यात येत असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे नेते बान की मून यांनी येथे सांगितले. मंडेला हे २० व्या शतकातील जबरदस्त व्यक्तिमत्वांपैकी एक असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मून यांनी केला.
नेल्सन मंडेला यांनी आयुष्यात केलेले कार्य दक्षिण आफ्रिकेच्या जनतेसह जगात सर्वानाच प्रेरणादायक ठरले असून मंडेला, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या तमाम चाहत्यांसमवेत आमच्या प्रार्थना आहेत, असे मून यांनी नमूद केले.
‘मृत’ म्हटल्याबद्दल दिलगिरी
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असतानाही ते ‘मृत’ झाल्याचे चुकीने घोषित केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे विकासमंत्री गॅरी ग्रे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या दूताकडे गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली.आपण याबद्दल बिनशर्त दिलगिरी व्यक्त करीत असून असे म्हटल्याबद्दल दु:ख होत आहे, असे ग्रे यांनी सांगितले. मंडेला हे मरण पावल्याची बातमीवजा अफवा ट्विटरवरून प्रसारित झाल्यानंतर बुधवारी रात्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाषण करताना ग्रे यांनी ही चूक केली होती.
मंडेला जागतिक नायक -ओबामा
दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला हे संपूर्ण विश्वासाठी नायकासारखेच आहेत, या शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंडेला यांचा गौरव केला आहे. मंडेला हे जागतिक नायक आहेत आणि त्यांचे अतुलनीय कार्य पिढय़ान्पिढय़ा आपल्या स्मरणात ठेवतील,असे ओबामा म्हणाले. मंडेला हे जसे माझे नायक आहेत तसेच ते संपूर्ण जगाचेही नायक आहेत, या शब्दांत ओबामा यांनी मंडेलांचे मोठेपण नमूद केले. राजकारणात येण्यासाठी मंडेला यांनीच आपल्याला प्रेरणा दिली, असेही ते म्हणाले.
मंडेलांच्या कन्येकडे राजदूतपद
नेल्सन मंडेला यांच्या कन्या झेनानी द्लामिनी यांनी पाराग्वे येथे आपल्या देशाच्या राजदूतपदाची सूत्रे सादर केली. द्लामिनी या सध्या दक्षिण आफ्रिकेच्या अर्जेन्टिनातही राजदूत आहेत. द्लामिनी या अमेरिकेत शिकलेल्या असून आता अर्जेन्टिनाबरोबरच पाराग्वेतही दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. द्लामिनी यांनी पाराग्वेचे परराष्ट्रमंत्री जोस फेलिक्स फर्नाडिस यांच्याकडे सूत्रे सादर केली. त्यावेळी फर्नाडिस यांनी मंडेला यांच्या प्रकृतीची चौकशी त्यांच्याकडे केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.