पीटीआय, ढाका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर दोघांना बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने रविवारी सामूहिक हत्याकांडासह इतर आरोप अधिकृतपणे ठेवले. विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक मार्गाने दडपून टाकण्याचा कथित आरोप त्यांच्याविरुद्ध करण्यात आला आहे. सुनावणीची प्रक्रिया प्रसारमाध्यमांद्वारे ‘लाइव्ह’ करण्यात येत आहे. लवादाने हसीना यांच्याविरुद्ध नव्याने अटक वॉरंटही जारी केले.
बांगलादेशमध्ये हसीना यांचे सरकार जाऊन १० महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सुनावणीला सुरुवात झाली आहे. हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाच्या खंडपीठाने हसीना यांच्यावरील आरोपांची दखल घेतली. न्या. गुलाम मुर्तझा माजुमदार यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठ सुनावणी घेत आहे. लवादाने १४५ पानांचा सारांश ऐकल्यानंतर हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल यांच्याविरुद्ध नव्याने अटक वॉरंट जारी केले. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्लाह अल-मामून हे या प्रकरणातील तिसरे आरोपी असून, सध्या ते कोठडीत आहेत. लवादाने हसीना आणि सहआरोपींना दोषी ठरवले, तर त्यांना मृत्युदंडाचीही शिक्षा होऊ शकते. सुनावणीपूर्वी लवादाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन देशी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुनावणी उशिरा सुरू झाली.