Bangladesh National Anthem Controversy: काँग्रेस नेते विधू भूषण दास यांनी पक्षाच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत गायल्यामुळे आता काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे. आसाम राज्यातील श्रीभूमी जिल्ह्यात २७ ऑक्टोबर रोजी सेवा दलाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधू भूषण दास यांनी बागंलादेशचे ‘आमार सोनार बांगला’ हे राष्ट्रगीत गायले. भाजपाने या घटनेवर जोरदार टीका केली असून काँग्रेस मतपेटीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
आसामचा श्रीभूमी शहर हे बांगलादेशच्या सीमेला लागून वसलेले आहे. या जिल्ह्यात बंगाली भाषिकाची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेस नेत्याच्या या कृतीमुळे भाजपाकडून आता ध्रुवीकरणाच्या राजकारणाची टीका होत आहे.
भाजपाचे आमदार कृष्णेंदू पॉल यांनी काँग्रेसच्या कृतीवर टीका केली. बांगलादेश आणि बांगलादेशींबद्दल काँग्रेसला नेहमीच फार पुळका राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली. आसामचे आरोग्य मंत्री अशोक सिंघल यांनीही दास यांचा बांगलादेशचे राष्ट्रगीत गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. एक्सवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
‘काँग्रेसला ग्रेटर बांगलादेश तयार करायचा आहे’
अशोक सिंघल म्हणाले, “श्रीभूमी येथील काँग्रेसच्या बैठकीत बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांगला’ गायले गेले. हे तेच लोक आहेत, जे ईशान्य भारताला मुख्य भारतापासून वेगळे करू इच्छित होते. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष आसाममधील अवैध घुसखोरांना का पाठिंबा देत होता, याचे कारण आता समोर आले आहे. राज्यातील लोकसंख्येचा पोत बदलून काँग्रेसला येथे ग्रेटर बांगलादेश तयार करायचा आहे.”
२०२६ च्या निवडणुकीपूर्वी मुद्दा तापणार?
आसाम भाजपाने काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, हा योगायोग होता की, बांगलादेशच्या मुस्लीमांना जवळ करण्यासाटी जाणुनबुजून केलेली कृती? २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेटीचे राजकारण करण्यासाठी काँग्रेसकडून ही खेळी खेळण्यात आली आहे का? असाही सवाल भाजपाने उपस्थित केला.
भाजपाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, बांगलादेशच्या सरकारने ईशान्य भारताचा भाग त्यांच्या नकाशात दाखवला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते बांगलादेशचे राष्ट्रगीत गात आहेत. यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
