Attacks on minorities in Bangladesh : बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू नागरिकांवर हल्ले होत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यादरम्यान बांगलादेशच्या मोहम्मद यूनुस प्रशासनातील परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन सोमवारी बोलताना म्हणाले की, बांगलादेशने दोन्ही देशांमधील सन्मान आणि सामाईक हिताच्या आधारावर भारताबरोबरील संबंध मजबूत राखण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदायाविरोधात होणार्‍या हिंसाचाराच्या घटना या भारतासाठी चिंतेचा विषय असू शकत नाहीत असेही म्हटले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशात अल्पसंख्यांकावर होत असलेले हल्ले आणि यूनुस प्रशासनाने आपल्या अंतर्गत मुद्द्यांसाठी भारताला जबाबदार ठरवत केलेल्या आरोपांबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर हुसेन यांनी उत्तर देत हे वक्तव्य केले आहे.

बांगलादेशचे म्हणणे काय?

सरकारी वृत्तसंस्था बीएसएसने हुसेन यांच्या हवाल्याने सांगितले की, “बांगलादेश नक्कीच आपली भूमिका निश्चित करेल. मात्र याबरोबरच भारताला हे निश्चित करावे लागेल की त्यांना बांगलादेशबरोबर कोणत्या पद्धतीचे नाते हवे आहे. हा परस्परांमधील मुद्दा आहे आणि असे म्हणणे चुकीचे नाही,” असे हुसेन म्हणाले. त्यांनी भारताबरोबर त्यांच्या संबंधाबद्दल बांगलादेशच्या भूमिकेवर भर दिला आणि सहकार्याच्या दृष्टीकोनाचे महत्त्व देखील अधोरेखित केले. “आम्हाला परस्पर समंजसपणावर आधारित संबंध हवे आहेत आणि आमच्या भूमिकेत कोणतीही अस्पष्टता नाही,” असे हुसेन हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

एस जयशंकर काय म्हणाले होते?

एस जयशंकर यांनी शनिवारी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. अशा घटनांबद्दल ते म्हणाले की, या घचना भारताच्या विचारांना प्रभावित करतात. त्यांनी असाही सल्ला दिली ही ढाकाने नवी दिल्लीबरोबर आपल्या संबंधावर स्पष्ट निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जयशंकर म्हणाले होते की, “बांगलादेशात अल्पसंख्यांकावरील हल्ल्यांमध्ये झालेल्या वाढीने स्पष्टपणे आमच्या विचारांना प्रभावित केले आहे आणि हे असे काही आहे ज्यावर आपण बोलले पाहिजे, जे की आम्ही केले आहे.”

ते पुढे बोलताना म्हणाले की, “दुसरी बाजू ही आहे की, त्यांचे स्वत:चे वेगळे राजकारण आहे, मात्र अखेर आपण शेजारी आहोत. त्यांना याबद्दल आपले मत तयार करावे लागेल की त्यांना आपल्याबरोबर (भारत) कसे संबंध ठेवायचे आहेत.” पुढे बोलताना जयशंकर म्हणाले बांगलादेश भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा दावा करू शकत नाही, जेव्हा की ते त्यांच्या देशातील समस्यांसाठी नवी दिल्लीला जबाबदार ठरवत आहेत. ते म्हणाले की, “तुम्ही एकीकडे असे म्हणू शकत नाहीत की आम्हाला आता तुमच्याबरोबर चांगले संबंध ठेवण्याची इच्छा आहे, मात्र सकाळी जागे होतात आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी आम्हाला दोषी ठरवता. हा देखील असा एक निर्णय आहे जो त्यांनी घ्यायचा आहे.”

मात्र हुसेन यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांबद्दलची चिंता ही अंतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच ही भारतासाठी चिंतेची बाब नसावी असेही म्हटले आहे. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले की, “बांगलादेशातील अल्पसंख्यांक हे बांगलादेशचा मुद्दा आहे, जसे की भारत त्यांच्या अल्पसंख्यांकांशी कसा व्यवहार करते हा भारताचा प्रश्न आहे.” ते पुढे म्हणाले की, “म्हणून, मला वाटते की हस्तक्षेप न करण्याचे धोरण पाळले पाहिजे. आम्ही अल्पसंख्यांकांचा मुद्दा हाताळत आहोत. ते बांगलादेशाचे नागरिक आहे. त्यांच्याकडे माझ्याप्रमाणेच अधिकार आहेत आणि सरकार त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.