पूर्व बांगलादेशात हल्लेखोरांनी मंगळवारी एका बसवर पेट्रोल बॉम्ब टाकून ती पेटवल्याने सात प्रवासी जळून मरण पावले. बांगलादेशात राजकीय आंदोलनात आतापर्यंत झालेल्या हिंसाचारातील हा सर्वात भीषण हल्ला होता. आतापर्यंतच्या हिंसाचारात ५४ जण ठार झाले आहेत.
माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बसवर हल्ल्याचे कृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही बस कॉक्स बझार येथून ढाक्याकडे जात असताना त्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले.
महामार्ग पोलिसांनी सांगितले, की ढाका-चितगाव रस्त्यावरील छोडोग्राम भागात या बसवर हल्ला झाला. जखमींना ढाका मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतरांना कोमिला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात सात जण ठार तर इतर १६ जण जखमी झाले आहेत.
रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले, की मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमी झालेले काही प्रवासी उपचाराच्या पलीकडे आहेत, त्यांच्यापैकी तीन जण ७० टक्के भाजले आहेत.
एकाच वेळी झालेल्या दोन हल्ल्यात विरोधी कार्यकर्त्यांनी रेल्वे मार्ग उखडून टाकल्याने चितगाव येथे रेल्वेगाडी घसरली व त्यानंतर त्यांनी रेल्वेवर पेट्रोल बॉम्ब फेकले. नंतर दुसऱ्या एका रेल्वेगाडीवर त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. या दोन घटनांत १४ प्रवासी जखमी झाले आहेत. २४ तासांत रेल्वेवर हा दुसरा हल्ला होता, त्यामुळे चितगावचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे.
घातपाताच्या शक्यतेने रेल्वेगाडय़ांचा वेग कमी करावा लागला होता. गेल्या २४ तासांत ढाक्यात १५ वाहने जाळण्यात आली.