रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धामुळे वेगवेगळ्या देशातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहे. भारत सरकारकडून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थी तसेच नागरिकांना भारतात परत आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारताने फक्त भारतीय नागरिकांनाच युक्रेनबाहेर न काढता पाकिस्तान, नेपाळ या देशांतील अनेक नागरिकांची सुटका केली आहे. भारताने ९ बांगलादेशी नागरिकांना युक्रेनबाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्यात मदत केली असून या उदार भूमिकेमुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारत सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. या मोहिमेत भारत फक्त भारतीयच नव्हे तर पाकिस्तान, नेपाळ आणि ट्युनिशिया या देशातील नागरिकांनाही युद्ध स्थळावरुन सुखरुप ठिकाणी नेत आहे. भारताने नुकतंच युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून ९ बांग्लादेशी नागरिकांची सुटका केली. भारताच्या याच भूमिकेमुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

याआधी भारतीय बचाव पथकाने नेपाळ, पाकिस्तान या देशांतील नागरिकांनाही मदत केलीय. नुकतंच एका पाकिस्तानी विद्यार्थिनीचा व्हिडीओ समोर आला होता. या विद्यार्थिनीला संघर्षग्रस्त भागातून बाहेर काढण्यात भारतीय बचावपथकाने मदत केली होती. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी विद्यार्थिनी भारत सरकार तसेच नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेमधील सुमे येथे अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. या भागात रशियाकडून मोठ्या प्रामाणात हल्ले केले जात आहेत. ऑपरेशन गंगा सुरु केल्यापासून आतापर्यंत १५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आलंय. तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा करुन ग्रीन कॉरिडोअरची मागणी केली होती.