IAS Murari Lal Tayal : हरियाणा केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी मुरारी लाल तायल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईत मुरारी लाल तायल यांच्याकडे तब्बल १४ कोटींचा बँक बॅलन्स, ७ अपार्टमेंट आणि २ बंगले आढळून आले आहेत. आता त्यांची ही संपूर्ण मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) सुरू असलेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत मुरारी लाल तायल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने जप्त केलेल्या एकूण मालमत्तेची किंमत तब्बल कोट्यवधींच्या घरात आहे. यामध्ये चंदीगड, नवी दिल्ली आणि गुडगाव येथील दोन अलिशान बंगले आणि ७ अपार्टमेंटसह १४.०६ कोटी रुपयांच्या बँक बॅलन्सचा समावेश आहे. तायल यांच्यावर केलेल्या कारवाईची ईडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, २००५ ते २००९ या काळात मुरारी लाल तायल यांनी हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेलं आहे. भूपिंदर सिंग हुड्डा यांचे प्रधान सचिव असताना आणि सीसीआयचे सदस्य असताना मुरारी लाल तायल यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून तायल यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
सीबीआयने या प्रकरणात दाखल गुन्ह्यानंतर (एफआयआर) ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, १ जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत तायल यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात तायल यांची पत्नी सविता तायल आणि मुलगा कार्तिक तायल यांच्या आर्थिक नोंदी आणि त्यांची आयकर विवरणपत्रे आणि इतर आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करत आहे.
दरम्यान, मानेसरमधील जमीन अधिग्रहणातील कथित अनियमिततेबाबत सीबीआयने २०१५ रोजी पहिला एफआयआर नोंदवला होता. तसेच पहिल्या एफआयआरमध्ये सीबीआयने केलेल्या तपासाच्या आधारावर २०१७ मध्ये तायल यांच्याविरुद्ध त्याच्या कथित बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित दुसरा गुन्हा दाखल केला होता.