चंदीगढमधील बर्नाला तुरुंगामध्ये हत्येच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत असणाऱ्या एका आरोपीने मानसा न्यायालयामध्ये पोलीस अधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. येथील तुरुंग अधिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी आपल्या पाठीवर गरम लोखंडी सळीईने ‘आतंकवादी’ असं लिहिल्याचा दावा या आरोपीने केलाय. आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचंही त्याने म्हटलं आहे.

अमलीपदार्थ आढळून आल्याच्या प्रकरणामधील सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर पटियाला जिल्ह्यातील बालमगड गावातील करमजीत सिंग याचा हजर करण्यात आलं. त्यावेळीच त्याने तुरुंगामध्ये होत असणाऱ्या छळासंदर्भातील तक्रार न्यायालयाकडे केली आहे.

“तुरुंग अधिक्षक बलबीर सिंग आणि हवालदार जगरुप सिंग यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने माझ्या पाठीवर आतंकवादी अशा शब्द गरम सळीईने लिहिल्याचा दावा आरोपीने केलाय. “तुरुंगामधील आरोपींच्या मुलभूत अधिकारांना डावललं जात असल्याविरोधात मी आवाज उठवला म्हणून मला ही शिक्षा देण्यात आली,” असं करमजीतने म्हटलं आहे. तुरुंगामध्ये कैद्यांना पोषक आहार दिला जात नसल्याचा आरोप करमजीतने केलाय.

रुग्णालयामध्ये डॉक्टर किंवा औषधे देणारी व्यक्तीही नसते. अनेकदा रुग्णांना फार तास वाट पहावी लागते. आरोग्य विषयक समस्या असली तरी रात्रीच्या वेळी प्रतिसाद मिळत नाही. तुरुंगातील कॅनटीमधील पदार्थ जास्त किंमतीला विकले जातात. लाच घेतल्यानंतर काही कैद्यांना विशेष वागणूक दिली जाते, असंही करमजीतने म्हटलं आहे. करमजीतने त्याच्या पाठीवर कोरलेला आतंकवादी हे व्रणही दाखवला. न्यायालयाने बरनाला मुख्य न्यायाधिशांकडे हे प्रकरण वर्ग केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरुंग अधिक्षक बलबीर सिंग यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत असं काहीही घडलेलं नसल्याचं म्हटलं आहे. आरोपीने हे त्याच्या सोबतच्या आरोपींच्या मदतीने केलं आहे. करमजीतवर ११ प्रकरणांसंदर्भात सुनावणी सुरु आहे. आम्ही त्याला वेगळ्या कोठडीत ठेवल्याने त्याने रागात हे कृत्य करुन आमच्यावर आरोप केले आहेत. आम्ही त्याला आज कोर्टात आणायचं असताना त्याच्या पाठीवर कशाला काही लिहू?, असा युक्तीवाद पोलिसांनी केलाय.