PM Modi speech on Operation Sindoor in Parliament: भारतीय सैन्यदलाने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत सोमवार आणि मंगळवारी चर्चा झाली. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर दिले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरची सर्व माहिती देत असतानाच विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. सर्व देश सैन्यदलाचा अभिमान व्यक्त करत असताना विरोधक मात्र पाकिस्तानची बाजू घेत आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
भारताने जागतिक नेत्यांच्या सांगण्यावरून शस्त्रविराम करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपाला उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानकडून शस्त्रविराम करण्यासाठी गयावया करण्यात आली. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्या विधानाचा हवाला देताना पंतप्रधान मोदींनी म्हटले, “तुम्ही खूप मारले. आता आणखी मार खाण्याची आमच्यात ताकद नाही. बस करा.”
“ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केल्यानंतर काही मिनिटांतच भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला सांगितले की, आम्ही या या ठिकाणांवर हल्ला केला आहे आणि आमचे पुढील लक्ष्य काय आहे. आपल्या सैन्याने ठरविलेल्या लक्ष्याचा १०० टक्के लक्ष्यभेद केला. हे ऐकल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांपासून हात झटकण्याऐवजी त्यांची साथ दिली. त्यानंतर भारताने पुढील लक्ष्य भेदले”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
सरकारने सैन्याचे हात बांधले होते, त्यांना लष्करी कारवाई करण्याची मोकळीक दिली नाही, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. यावर उत्तर देत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांनाच लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला होता. याची चर्चा सैन्य दलाशीही झाली होती.”
ऑपरेशन सिंदूरमधून आम्ही तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
- जर भारतावर दहशतवादी हल्ला केलात, तर भारत अतिशय चोख असे प्रत्युत्तर देईल. तेही आपल्या स्वतःच्या पद्धतीने.
- यापुढे अणुबॉम्बच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाहीत.
- आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे सरकार आणि दहशतवाद्यांचे मास्टरमाईंड यांना वेगळे समजणार नाहीत.
‘जागतिक नेत्याने शस्त्रविराम करण्यास सांगितले नाही’
जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा, असे सांगितले नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. ९ मे च्या रात्री अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी फोन उचलू शकलो नाही. त्यानंतर एक तासाने मी संपर्क केला. तेव्हा त्यांनी मला सांगितले, “पाकिस्तान तुमच्यावर मोठा हल्ला करणार आहे.”
“मी त्यांना उत्तर दिले की, जर पाकिस्तानचा हा प्रयत्न असेल तर त्यांना महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर त्यापेक्षा मोठा हल्ला करुन आम्ही उत्तर देऊ. गोळीचे उत्तर आम्ही तोफगोळ्याने देऊ असेही मी स्पष्ट केले. मी आज लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा सांगतो ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. पाकिस्तानने कुठलीही आगळिक केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.