भारतात या वर्षी कर्करोगाचे १३.९ लाख रुग्ण असण्याचा अंदाज असून २०२५ पर्यंत ही संख्या १५.७ लाख असेल. महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त राहील असे एका अहवालात म्हटले आहे.
ऐझाल जिल्ह्यात ( मिझोराम) पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण १ लाखात २६९.४ आहे, तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ात ते लाखात ३९.५ आहे. महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण पापुमपारे (अरुणाचल) जिल्ह्य़ात लाखात २१९.८ असून उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ात कर्करोगाचे प्रमाण लाखात ४९.४ आहे. आयसीएमआर व बंगळूरुयेथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज इनफॉर्मेटिक्स अँड रीसर्च यांनी हा अहवाल जाहीर केला असून भारतात पुरुषातील कर्करुग्णांची संख्या २०२० मध्ये ६ लाख ७९ हजार ४२१ राहील. ती २०२५ मध्ये सात लाख ६३ हजार ५७५ राहील.
महिलांमध्ये ही संख्या ७ लाख १२ हजार ७५८ राहील ती २०२५ मध्ये ८ लाख ६ हजार २१८ होईल. २०२५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २ लाख ३८ हजार ९०८ असेल तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण १ लाख ११ हजार ३२८ तर तोंडाच्या कर्करोगाचे ९० हजार ६० रुग्ण असतील. तंबाखूशी संबंधित ककरोगाचे रुग्ण २०२० मध्ये ३.७ लाख असतील ते एकूण कर्करोगाच्या २७.१ टक्के असतील. ईशान्येकडे तंबाखूजन्य कर्करोगाचे प्राण वाढणार असून त्या खालोखाल आतडय़ाच्या व स्तनाच्या कर्करोगातील वाढ असेल.
भारतीय वैद्यकसंशोधन परिषदेने म्हटले आहे की, महिलात स्तनाचा कर्करोग २ लाख (१४.८ टक्के), गर्भाशय मुखाचा कर्करोग ०.७५ लाख (५.४ टक्के), राहील तर महिला व पुरुषात आतडय़ाचा कर्करोग २.७ लाख रुग्ण म्हणजे १९.७ टक्केराहील.