Shivraj Singh Chouhan on Pushpak Vimaan: प्राचीन काळी भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके प्रगत होते की, राईट बंधूंनी जगातील पहिले विमान बनविण्यापूर्वी भारताकडे पुष्पक विमान होते, असा दावा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. भोपाळमधील “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च” (IISER भोपाळ) या संस्थेच्या च्या १२ व्या दीक्षांत समारंभात बोलताना चौहान यांनी हा दावा केला आहे.
राईट बंधूंआधी आपल्याकडे पुष्पक विमान
शिवराज सिंह चौहान पुढं म्हणाले, गुलामगिरीच्या अथांग सागरात भारत नंतरच्या काळात बुडाल्यामुळे भारताची तांत्रिक प्रगती खुंटली.
“जग अज्ञानाच्या अंधारात असताना भारताने ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला होता, अशी ही भूमी आहे. आपले विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप प्रगत होते. राईट बंधूंचा जन्म होण्याच्या कितीतरी आधी भारतात पुष्पक विमान होते”, असे केंद्रीय मंत्री शिवराज चौहान म्हणाले.
भारताच्या प्राचीन काळातील शस्त्र आणि अस्रांची माहिती देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, तुम्ही आपल्या पुराणात अग्नीअस्त्र, वरुणास्त्र आणि ब्रह्मास्त्र यांचा उल्लेख वाचला असेल. हे अस्त्रांचा वापर महाभारतात झाला होता. लक्ष्याला भेदल्यानंतर हे अस्त्र पुन्हा आपल्या भात्यात येत होते. आज क्षेपणास्त्र डागली जातात, ड्रोन्स सोडली जात आहेत, अशावेळी भारताने याचा वापर खूप पूर्वीच केल्याचे दिसते.
भारताचं तंत्रज्ञान कुठं गेलं?
भारतात इतके प्रगत तंत्रज्ञान होतं, पण मग काळाच्या ओघात ते कुठं गेलं? यावरही चौहान यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, नंतरच्या काळात आपला देश गुलामगिरीत बुडाला. या काळात भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा तितकी प्रगती होऊ शकली नाही.
चौहान पुढे म्हणाले, हजारो वर्षांपूर्वीपासून भारत एक प्राचीन आणि महान राष्ट्र आहे. जगातील तथाकथित राष्ट्रांमध्ये जेव्हा नागरी संस्कृतीचा सूर्यही उगवला नव्हता, तेव्हा आपण वेदांचे स्त्रोत रचले होते आणि उपनिषदांचे पठण केले होते. आपल्याला देशाचा अभिमान असला पाहिजे.

चौहान यांचा अमेरिकेला इशारा
आणखी एका कार्यक्रमात बोलत असताना शिवराज सिंह चौहान यांनी अमेरिकेच्या टॅरिफ वाढीवर टीका केली. भारतीय नागरिकांनी आता भारतात तयार झालेल्या उत्पादनांचा वापर वाढवायला हवा, असे सांगताना चौहान म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनात आपण स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूच आपण विकत घेतल्या पाहिजेत. आपल्यावर काही लोक दादागिरी करत आहेत. जर आम्ही आमचा तिसरा डोळा उघडला तर दादागिरी करणाऱ्यांचा टिकाव लागणार नाही.