उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री दिनेश खटीक यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करणारं पत्र व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाशासित राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. आपण दलित असल्याने अधिकारी दुर्लक्षित करत असल्याचा आरोप योगींच्या मंत्रीमंडळामधील राज्यमंत्री असणाऱ्या खटीक यांनी पत्रात केलाय. हे पत्र त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पाठवल्याचे सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर उलट सुलट चर्चांना उधाण आलंय. विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही खाटीक यांनी पत्रात केलाय.

नक्की पाहा >> Photos: अमित शाहांच्या घरातील भिंतीवर असणाऱ्या सावकरांच्या आणि चाणक्य यांच्या फोटोंमागील गुपित माहितीय का?

खटीक यांनी त्यांच्या खात्याचे वरिष्ठ मंत्री स्वतंत्रा देव सिंह हे सुद्धा आपल्याला खात्याची कोणतीही कामं देत नसल्याचा आरोप केलाय. मात्र हे पत्र राज्यपाल किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेलं नाही असं सांगण्यात आलंय. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर योगी सरकारला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले असून या पत्रामुळे सरकारमधील खदखद समोर आल्याचं सांगितलं जात आहे. खटीक यांनी थेट शाह यांना पत्र पाठवल्याचं सांगितलं जात आहे. सामान्यपणे राज्यातील मंत्री त्यांचा राजीनामा राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा राज्यातील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पाठवतात. मात्र यापैकी कोणालाही खटीक यांचं राजीनामा देण्यासंदर्भातील पत्र मिळालेलं नाही.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

मेरठमध्ये या पत्रासंदर्भात पत्रकारांनी खटीक यांना विचारलं असता त्यांनी एका ओळखीत उत्तर दिलं. “मला कोणतीही समस्या नाही,” असं खटीक या पत्रासंदर्भातील प्रश्नावर म्हणाले. मागील महिन्यामध्ये खटीक यांचा त्यांच्या हस्तीनापूर मतदारसंघामध्ये पोलिसांशी वाद झाला होता. या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनी मध्यस्थी केली होती. या पूर्वीही अशाप्रकारे अनेक मंत्र्यांनी त्यांच्या विभागामधील कामासंदर्भात थेट केंद्रीय सचिवांना पत्रं लिहून तक्रारी केल्याची उदाहरणं आहेत.

खटीक यांचं हे व्हायरल झालेलं पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला मिळालं नसल्याने तसेच यासंदर्भात अधिकृत माहिती दिली जात नसल्याने या राजीनामा नाट्यासंदर्भातील संभ्रम कायम आहे.