पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदानादरम्यान भाजप उमेदवार रुपा गांगुलींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हावडा मतदानकेंद्राबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्तीला श्रीमुखात लगावल्याचा आरोप रुपा गांगुली यांच्यावर आहे. तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. रुपा याच विभागातून तृणमूलचे उमेदवार आणि पूर्वाश्रमीचे क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.

रुपा यांनी हाणामारीच्या आरोपाचे खंडन केले असून, मतदानादरम्यानच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी गेले असता आपल्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचे म्हटले आहे. रुपा गांगुली मतदानाच्या वेळी भाजप कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून मतदान केंद्रांचा दौरा करत होत्या. हाणामारी करतानाचा रुपाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, या व्हिडिओमध्ये तृणमूलच्या एका महिला कार्यकर्तीसोबत त्या हाणामारी करताना नजरेस पडतात.