“जय श्री राम”च्या घोषणा दिल्या नाही म्हणून एका गटाने आपल्याला मारहाण करुन धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले असा आरोप पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या हाफिझ मोहम्मद शाहरुख हल्दर (२६) यांनी केला आहे. ते मदरशामध्ये शिक्षक आहेत. हाफिझ गुरुवारी दुपारी दक्षिण २४ परगणा येथून हुगळीला चालले असताना ट्रेन प्रवासात त्यांच्यासोबत ही घटना घडली.

हाफिझ यांच्या सुदैवाने त्यांना गंभीर इजा झालेली नाही असे पोलिसांनी सांगितले. मी हुगळीला चाललो होतो त्यावेळी डब्यामध्ये काही जण “जय श्री राम”च्या घोषणा देत होते. त्यांनी मला सुद्धा ही घोषणा द्यायला सांगितली. पण मी नकार दिला. त्यावेळी त्यांनी मला मारहाण सुरु केली. कोणीही माझ्या मदतीला आले नाही. ट्रेन धाकुरीया आणि पार्क सर्कस स्थानकाच्या दरम्यान असताना ही घटना घडली. ट्रेन पार्क सर्कस स्टेशनवर असताना त्यांनी मला बाहेर ढकलून दिलं. त्यावेळी काही स्थानिकांनी मला मदत केली असे हाफीझ मोहम्मद शाहरुख हल्दर यांनी सांगितले.

हाफिझ यांना किरकोळ मार लागला. त्यांना चित्ररंजन रुग्णालयात नेऊन व्यवस्थित उपचार करण्यात आले. ट्रेन प्रवासात चढण्या-उतरण्याच्या वादातून त्यांना मारहाण झाली असावी असे वाटते. आणखी दोन ते तीन जणांना किरकोळ दुखापत झाली असून तपास सुरु आहे. अद्यापपर्यंत कोणलाही अटक करण्यात आलेली नाही असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

३४५३१(कॅनिंग-सीलदाह) ट्रेनमध्ये हा प्रकार घडला असे हल्दर यांचा दावा आहे. दक्षिण २४ परगणामध्ये बसंती येथे हल्दर राहतात. गुन्हा नोंदवण्यासाठी ते तोपसिया पोलीस स्थानकात गेले होते. तिथून त्यांना रेल्वे पोलिसांकडे पाठवण्यात आले. रेल्वे पोलिसांनी विविध कलमातंर्गत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.